मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा १० विकेटने दारुण पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय टीमच्या बॅटिंगवर प्रश्न उपस्थित झाले. या मॅचमध्ये विराट कोहलीऐवजी केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. भारताने शिखर धवन, रोहित शर्मा आणि केएल राहुल या तिन्ही ओपनरना खेळवण्याचा निर्णय घेतल्यामुळे विराटला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यायला लागलं. टीम इंडियाच्या या निर्णयावर माजी क्रिकेटपटू आणि समिक्षकांनी आक्षेप नोंदवला.
विराट कोहलीनेही आमची ही रणनिती अपयशी झाल्याचं मॅचनंतर सांगितलं. तसंच पुढच्या वनडेमध्ये आपणच तिसऱ्या क्रमांकावर खेळू, अशी शक्यताही वर्तवली. त्यानंतर आता शिखर धवन यानेही आपण तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करु शकतो, असं सांगितलं आहे.
'जर मला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करायला सांगितली तर मी निश्चितच करेन. देशासाठी मी काहीही करु शकतो. तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत व्हावं लागेल. सगळे खेळाडू मानसिकदृष्ट्या मजबूत असल्यामुळेच ते भारताकडून खेळत आहेत. कधी कधी तुम्हाला बदल करावे लागतात. कुठल्या क्रमांकावर बॅटिंग करायची याचा निर्णय कर्णधार स्वत: घेईल. तिसऱ्या क्रमांकावर विराटने चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे पुन्हा तो त्याच क्रमांकावर दिसू शकतो,' असं धवन म्हणाला.
भारताचे माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, आकाश चोप्रा आणि हरभजन सिंग तसंच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनेही विराटला जास्तीत जास्त वेळ बॅटिंगची संधी मिळाली पाहिजे, त्यामुळे त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळावं, असं मत मांडलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शिखर धवनने सर्वाधिक ७४ रन केले, तर राहुलने ४७ रन आणि विराट कोहलीने १६ रन केले. या मॅचमध्ये भारताचा २५५ रनवर ऑलआऊट झाला. डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच यांनी नाबाद शतकी खेळी करुन भारताचं हे आव्हान पार केलं.