शार्दूल ठाकूर म्हणाला, 'धोनीने सांगितले होते आधी बॉल बघ आणि नंतर शॉट मार'

  मॅन ऑफ दी मॅच फाफ डू प्लेसिसच्या ४२ चेंडूत झंझावाती नाबाद ६७ खेळीच्या जोरावर मंगळवारी पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने हैदराबादला हरवले. 

Updated: May 23, 2018, 12:30 PM IST
शार्दूल ठाकूर म्हणाला, 'धोनीने सांगितले होते आधी बॉल बघ आणि नंतर शॉट मार' title=

मुंबई :  मॅन ऑफ दी मॅच फाफ डू प्लेसिसच्या ४२ चेंडूत झंझावाती नाबाद ६७ खेळीच्या जोरावर मंगळवारी पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने हैदराबादला हरवले. या विजयासोबत चेन्नई सातव्यांदा फायनलमध्ये पोहोचली. डू प्लेसिसने नाबाद ६७ धावांची खेळी करताना पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. हैदराबादने विजयासाठी ठेवलेल्या १४० धावांचा पाठलाग करताना चेन्नईने ११३ धावांवर ८ विकेट गमावल्या होत्या. मात्र प्लेसिसने १८व्या शतकात २० आणि १९व्या शतकांत १७ धावा करताना चेन्नईला विजयासमीप पोहोचवले. त्यानंतर २०व्या शतकांतील पहिल्या चेंडूवर षटकार मारत चेन्नईला दोन विकेटनी विजय मिळवला.

अखेरीस शार्दूल ठाकूरने डू प्लेसिसला चांगली साथ दिली. त्याने पाच चेंडूत तीन चौकारांच्या साथीने १५ धावा केल्या. तो नाबाद परतला. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना शार्दूल म्हणाला, मी विचार केला की मला चांगली संधी मिळालीये आणि माझ्यासाठी संघासाठी धावा करणे महत्त्वाचे आहे. डू प्लेसिस सेट झाला होता. तसेच मी प्रशिक्षकांना सतत सांगत असतो की मी फलंदाजी करु शकतो. गेल्या वर्षी मला पुण्याकडून दोन वेळा फलंदाजीची संधी मिळाली होती. यावेळी गेम फिनिश करावासा वाटत होता.

यावेळी धोनीने फलंदाजीस निघताना काही सल्ला दिला होता का असे विचारले असता तो म्हणाला, हो धोनी मला म्हणाला होता की आधी चेंडू बघ त्यानंतर शॉट मार. डू प्लेसिस आणि मी चर्चा केली. त्याने मला एकेक धाव काढण्याचा सल्ला दिला होता मात्र आम्हाला लागोपाठ चौकार मिळत गेले. यामुळे क्रिकेट चाहत्यांचेही मनोरंजन झाले. विश्वास नेहमीच असतो. जर तुम्हाला विजयाची शाश्वती असेल तर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल.