मुंबई : वानखेडे स्टेडियममधील सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या, प्रेसिडेंट बॉक्सचे फक्त २ पास कार्यकारिणीच्या आजी - माजी सदस्यांना देण्यात आले आहेत. 'एमसीए'चे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना देण्यात आलेल्या, गेल्या २ सामन्यांचे पास परत पाठवून दिले आहेत. ही वागणूक 'एमसीए'च्या कार्यकारणी कार्यवाहीत ऑन रेकॉर्ड आणण्याच्या सूचना देखील शरद पवार यांनी दिल्या आहेत.एकंदरीत संयमी म्हणून ओळखले जाणारे शरद पवार, यांचा संताप अनावर झाला आहे.
आजी-माजी क्रिकेटपटूंना प्रत्येकी २ पास देण्यात आले आहेत, क्रिकेट क्लबना प्रत्येकी १० पास देण्यात आले आहेत. क्रिकेट क्लब ते पास विकणार नाहीत, याची हमी त्यांना प्रशासकांना द्यावी लागत आहे.
'एमसीए'ची सर्व सूत्रं प्रशासकांकडे गेली आहेत, यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनची राजकीय नाकेबंदी झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले, एम व्ही कानडे यांची 'एमसीए'वर प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच बैठकीत प्रशासकांची कठोर पावलं उचलली आहेत. प्रशासकांनी विद्यमान 'एमसीए' अध्यक्ष आशीष शेलार यांना उद्देशून म्हटलं, आता आम्ही इथले बॉस.
आशीष शेलार यांना आम्ही येथील बॉस असं म्हटल्याने, आता शेलार यांनी 'एमसीए'च्या पुढील उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास दर्शवली अनुत्सुकता दर्शवली आहे. सध्या सुरु असलेल्या 'आयपीएल'च्या व्हीआयपी पास आणि तिकीट वाटपावरून 'एमसीए'मध्ये मोठा वाद सुरु आहे. व्हीआयपी पास आणि तिकीट वाटपाचे अधिकारही प्रशासकांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत.
'एमसीए'चं प्रतिनिधीत्व केलेल्या राजकीय नेत्यांच्या तसबिरी प्रशासकांनी अध्यक्षांच्या दालनातून हटविल्या आहेत. लोढा समितीच्या शिफारसी स्वीकारण्यासाठी 'एमसीए'च्या घटनेत दुरुस्ती करणं आवश्यक आहे. त्यासाठी १६ एप्रिलला बोलावण्यात आलेली पूर्वनियोजित विषेश सर्वसाधारण सभा प्रशासकांनी पुढे ढकलली आहे.
आता २५ किंवा २६ एप्रिलला प्रशासक कार्यकारणी सदस्यांबरोबर अनौपचारिक बैठक घेतील, आणि त्यामध्ये विशेष सर्वसाधारण सभा कधी घ्यावी, यावर चर्चा होऊन निर्णय घेणे अपेक्षित मानले जातेय.उच्च न्यायालयाने प्रशासकांची नेमणूक करताना 'एमसीए' कार्यकारिणीतील पुढील सदस्यांचं पद कायम ठेवले आहे, यात
१) आशीष शेलार - अध्यक्ष
२) गणेश अय्यर
३) उन्मेष खानविलकर
४) नवीन शेट्टी
५) अरमान मलिक
६) शाह आलम यांचा समावेश आहे.