अजिंक्यसोबत मैदानात उतरला या दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा

अजिंक्य रहाणेनं एका लहान मुलासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Updated: Apr 18, 2018, 08:20 PM IST
अजिंक्यसोबत मैदानात उतरला या दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा title=

जयपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा प्रशिक्षकपदाची भूमिका राहुल द्रविडनं अगदी चोख पार पाडली. राहुल द्रविडची दोन्ही मुलंदेखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. राहुल द्रविडचा मोठा मुलगा समितनं शालेय क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केलं. समितनंतर आता राहुलचा छोटा मुलगा अन्वयही चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानची टीम सराव करत असताना अन्वयही तिकडे पोहोचला. यावेळी अन्वय अजिंक्य रहाणेकडे गेला आणि त्याच्याकडून क्रिकेटच्या टीप्स घेतल्या. या दोघांचा फोटो राजस्थान टीमच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये द ज्युनियर वॉल म्हणून अन्वयला संबोधित करण्यात आलं आहे.

अजिंक्य रहाणेनं त्याच्या इन्स्टाग्रामवरही हा फोटो शेअर केला आहे. बघा आम्हाला पाठिंबा द्यायला कोण आलं आहे, असं कॅप्शन रहाणेनं या फोटोला दिलं आहे. रहाणे आणि अन्वयनं राजस्थानच्या टीमची एकाच क्रमांकाची जर्सी घातली आहे. अन्वय द्रविड हा अजून बराच लहान आहे त्यामुळे त्याला कोणत्याच क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होता आलेलं नाही. पण अन्वयचा मोठा भाऊ समितनं शालेय क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे.

- एप्रिल २०१६मध्ये समितनं १२५ रनची खेळी केली होती. यामध्ये २२ फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. अंडर १४ची ही मॅच होती.

- वडिलांप्रमाणेच समितही अनुशासन पाळतो. समित बहुतेक वेळ नेटमध्ये सराव करतो तसंच डाएटही चोख पाळतो.

- समित क्रिकेटशिवाय इतर खेळही खेळतो. मी त्याला फारसं प्रशिक्षण देत नाही. कारण त्याला खेळाचा आनंद लुटू दे. सध्या तो वेगवेगळे शॉट्स खेळत आहे, असं द्रविड एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता.

- मी समितला क्रिकेट खेळताना बघितलं आहे. त्याला खेळताना बघताना राहुल द्रविडचा भास होतो, असं श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरन म्हणाला होता.

- राहुल द्रविडचा मुलगा असल्यामुळे समितला कोणतीही विशेष वागणूक मिळत नाही. समितची निवड फक्त कामगिरीवरच करा, असं द्रविडनं समितचे प्रशिक्षक आणि शाळेला सांगितलं आहे.

- समितला माझ्यासारखं क्रिकेट खेळण्याची जबरदस्ती मी कधीच करत नाही. त्यानं स्वत:ची वेगळी स्टाईल बनवावी. याचं त्याला स्वातंत्र्य आहे, अशी प्रतिक्रिया राहुल द्रविडनं दिली होती.

२००३ साली राहुल द्रविडचं विजया पांढेकरसोबत लग्न झालं होतं. या दोघांना समित आणि अन्वय ही दोन मुलं आहेत. द्रविडनं टेस्टमध्ये १३,२८८ रन तर वनडेमध्ये १०८८९ रन केल्या आहेत.