Delhi Wrestlers Protest : दिल्लीतील महिला कुस्तीपटूंवर अन्याय, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar On Delhi Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला दहा दिवस झाले तरी सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. मात्र, या आंदोलनावर पोलीस कारवाई करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: May 4, 2023, 03:41 PM IST
Delhi Wrestlers Protest : दिल्लीतील महिला कुस्तीपटूंवर अन्याय, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया title=

Sharad Pawar On Delhi Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात  महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. मात्र, काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर येथे सुरु असणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता हिंसक वळण प्राप्त झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आले. पोलीस कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला दहा दिवस झाले तरी सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. मात्र, या आंदोलनावर पोलीस कारवाई करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीतील महिला कुस्तीपटूंवर पोलिसांनी केलेल्या अन्यायाबाबत शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. कुस्तीपटूंशी पोलिसांनी केलेलं वर्तन अस्वस्थ करणारे असल्याचे  पवार म्हणालेत. याबाबत पवार यांनी ट्विट केले आहे.  शांततापूर्ण आंदोलनांवरील पोलिसांच्या क्रूरतेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि मी वैयक्तिकरित्या भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन करतो, असे ट्विटमध्ये म्हटलेय.

आंदोलन ठिकाणाहून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी सुरु केला. परंतु, कुस्तीपटूंनी मात्र माघार घेण्यास नकार दिला. त्यानंतर दोन्ही गटांमधील वाद विकोपास गेला. कुस्तीपटू दिवसभराच्या आंदोलनानंतर रात्री झोपण्याची तयारी करत होते. त्याचवेळी पोलीस तिथे आले आणि त्यांनी आंदोलकांसह त्यांच्या समर्थकांना हटवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांकडू कारवाई करण्यात येत आहे. याबाबत कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, आम्हाला संपूर्ण देशाच्या पाठिंब्याची गरज आहे, सर्वांनी दिल्लीत यावे. पोलीस आमच्या विरोधात बळाचा वापर करत आहेत, महिलांवर अत्याचार करत आहेत आणि ब्रृजभूषण सिंह विरोधात काहीच करत नाहीत.

कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी पुणेकरांचे आंदोलन

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात अखेर दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. दरम्यान, दिल्लीत जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी पुणेकरांनी आंदोलन केले आहे. विविध संघटनांच्यावतीने प्रतिकात्मक कुस्त्या खेळून या शोषित कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यात आला आहे.

यावेळी आंदोलन करणाऱ्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी देखील पुणेकरांनी केली आहे. एसपी कॉलेज परिसरात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विविध क्रीडा क्षेत्रातील आजी-माजी खेळाडू सामील झाले होते.