नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या यो-यो टेस्टला महत्त्व प्राप्त झालं आहे. यो-यो टेस्टमध्ये पास झाल्यावरच खेळाडूचे भारतीय टीममध्ये निवड व्हायचे दरवाजे उघडतात. फूटबॉलसाठी बनवण्यात आलेल्या या अॅरोबिक टेस्टची फिटसनेससाठी भारतीय क्रिकेटमध्येही सुरुवात झाली. क्रिकेटपटूनंतरही आता भारतीय हॉकी टीमचा कर्णधार सरदार सिंगही यो-यो टेस्ट पास झाला आहे. सरदार सिंग फक्त यो-यो टेस्ट पासच झाला नाही तर त्याला विराट कोहलीपेक्षा जास्त मार्क मिळाले.
खराब फिटनेसमुळे सरदार सिंगला टीममधून डच्चू देण्यात आला होता. जवळपास १० वर्ष सरदार सिंग भारतीय टीमचा हिस्सा होता. डच्चू मिळाल्यानंतर सरदार सिंगनं फिट व्हायचं आव्हान स्वीकारलं आणि विराट कोहलीलाही पिछाडीवर टाकलं. सरदारनं यो-यो टेस्टमध्ये २१.४ पॉईंट्स मिळवले. भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड होण्यासाठी यो-यो टेस्टमध्ये कमीत कमी १६.३ पॉईंट्स मिळवणं बंधनकारक आहे. कोहलीनं यो-यो टेस्टमध्ये १९ पॉईंट्स मिळवले आहेत.
फिटनेस सुधारण्यासाठी सरदारनं प्रचंड मेहनत केली. यासाठी तो हॉकीपासूनही काही दिवस लांब राहिला. या कालावधीमध्ये सरदार सिंगनं पोषक आहारच खाल्ला. आवडते आलू पराठे खायची इच्छा झाली तरी सरदार आता बटाट्याऐवजी ब्रोकोली घालून पराठे खातो. सरदार सिंगला त्याच्या या मेहनतीचं फळ मिळालं. आशियाई खेळामध्ये सरदार सिंगची निवड झाली आहे.