नवी दिल्ली : आम्ही मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही, असं वक्तव्य माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नेहमी करायचे. याच विचारांमुळे वाजपेयींनी पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी फक्त राजकीय नाही तर खेळाचाही वापर केला. २००४ साली पंतप्रधान असताना अटल बिहारी वाजपेयींनी भारतीय क्रिकेट टीमला पाकिस्तानचा दौरा करण्याची परवानगी दिली. १९८९नंतर पहिल्यांदा भारतीय टीम संपूर्ण सीरिजसाठी पाकिस्तानला गेली होती. या दौऱ्याआधी वाजपेयींनी कर्णधार सौरव गांगुली आणि त्याचा टीमला बोलावलं होतं. वाजपेयींनी यावेळी सौरव गांगुलीला एक बॅट गिफ्ट दिली होती. या बॅटवर त्यांची 'अमन की खेलनीति' लिहिली होती.
'खेल ही नहीं, दिल भी जीतिए, शुभकामनाएं' असा संदेश या बॅटवर लिहिण्यात आला होता. भारतीय टीमला पाकिस्तानमध्ये भरपूर प्रेम मिळालं पाहिजे आणि दोन्ही देशांमधले संबंध सुधारले पाहिजेत, अशी वाजपेयींची आशा होती.
सौरव गांगुलीच्या टीमनं वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानचा ३-२नं आणि टेस्ट सीरिजमध्ये २-१नं पराभव केला. वाजपेयींनी सांगितल्याप्रमाणे भारतीय टीमनं सीरिजही जिंकली आणि पाकिस्तानच्या नागरिकांची मनंही जिंकली. सेहवागनं पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान टेस्टमध्ये ३०९ रनची खेळी केली. या खेळीनंतर सेहवागला मुलतानचा सुलतान ही नवी ओळख मिळाली.
दोन्ही देशाचे नागरिक जवळ यावेत म्हणून वाजपेयींनी फेब्रुवारी १९९९ मध्ये दिल्लीवरून लाहोरसाठी बससेवा सुरु केली. पण पाकिस्ताननं या अमन की आशाला धोका दिला. बस यात्रा सुरु झाल्यानंतर तीन महिन्यानी पाकिस्ताननं कारगिल युद्ध सुरु केलं. भारतानं हे युद्ध तीन महिन्यांनी जिंकलं. यामुळे दोन्ही देशांचं संबंध काही वर्ष खराब होते. वाजपेयींनी पुन्हा २००४ साली दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आणि भारतीय टीमला पाकिस्तानमध्ये खेळायला परवानगी दिली.