संजू नाराज! त्याची Insta पोस्ट पाहून चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सकडून खेळत असता तर...'

Sanju Samson Cryptic Social Media Post: वर्ल्डकपच्या संघामध्ये स्थान न दिल्यानंतर आशिया खेळांसाठीच्या संघातूनही त्याला डावलण्यात आलं. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी नाकारण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 20, 2023, 10:52 AM IST
संजू नाराज! त्याची Insta पोस्ट पाहून चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सकडून खेळत असता तर...' title=
संजूने पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा

Sanju Samson Cryptic Social Media Post: भारताचा स्टार फलंदाज संजू सॅमसनला पुन्हा डावलण्यात आलं आहे. भारताचे मुख्य विकेट कीपर्स असलेले ऋषभ पंत आणि के. एल. राहुल हे दोघेही जायबंदी असल्याने भारतासाठी यष्टीरक्षण करणाऱ्या संजू सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये संघात स्थान मिळालेलं नाही. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये केलेली सुमार कामगिरी आणि आशिया चषक स्पर्धेमध्ये दमदार पुनरागमन करत के. एल. राहुलबरोबरच इशान किशानने केलेल्या दमदार कामगिरीमुळे संजू सॅमसनला संघात स्थान मिळालेलं नाही.

फेसबुकवर केली पोस्ट

संजू सॅमसनला भारतीय विश्वचषक संघांमध्येही स्थान मिळालेलं नाही. तसेच त्याला भारताच्या आशियाई खेळांच्या संघातही स्थान देण्यात आलं नाही. विश्वचषक स्पर्धेआधी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेसाठीही संजू सॅमसनला संघात स्थान मिळालेलं नाही. साधं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीही संघात स्थान न मिळाल्याने संजू सॅमसनने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर 2 वेगवेगळ्या पोस्ट केल्या आहेत. फेसबुकवर त्याने केवळ स्मायली इमोजी पोस्ट केला आहे.

इन्स्टावरुनही सूचक भाष्य

इन्स्टाग्रामवर संजू सॅमसनने स्वत:चा चेंडू खेळून काढतानाचा फोटो पोस्ट करत, "जे आहे ते आहे. मी केवळ पुढे जात राहणार आहे," अशी कॅप्शन दिली आहे. 

अनेकांनी दिला धीर, काहींनी केला मुंबई इंडियन्सचा उल्लेख

या पोस्टवर अनेक चाहत्यांनी संजूला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी थेट मुंबई इंडियन्समध्ये असता तू तर तुझी निवड झाली असती असं म्हटलं आहे. अन्य एकाने सूर्यकुमारऐवजी संजूला स्थान द्यायला पाहिजे असं म्हटलं आहे. तू खरा चॅम्पियन आहेस, असं म्हणत अनेकांनी संजूला धीर दिला आहे.

संजूला वगळल्याने टीकेची झोड

विश्वचषकाच्या संघातून संजू सॅमसनला वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. संजू सॅमसनला पुरेशी संधी निवड समितीकडून दिली जात नसल्याचंही अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावरुन म्हटलं आहे. काही जणांनी तर संजूला अगदी परदेशात जाऊन खेळण्याचा सल्लाही दिला होता.

संजूची कामगिरी कशी?

संजूने खेळलेल्या 13 एक दिवसीय सामन्यांमध्ये 12 वेळा फलंदाजी केली असून 390 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 55.71 इतकी आहे. तर स्ट्राइक रेट म्हणजेच धावगती 104 इतकी असून 3 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 86 इतकी आहे. टी-20 सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास संजू सॅमसन 24 सामन्यांपैकी 21 सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी उतरला. त्यामध्ये त्याने 374 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट 133.57 इतका आहे. यामध्ये एका अर्धशतकांचा समावेश असून सर्वोच्च धावसंख्या 77 इतकी आहे.