Sanju Samson In T20 WC Squad : राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन याची अखेर टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी संजू सॅमसनला (Sanju Samson) भारतीय संघात स्थान देण्यात आलं. विकेटकिपर बॅटर म्हणून संजू टीम इंडियाकडून (Team India For T20WC) खेळणार आहे. मात्र, संजू सॅमसनसाठी इथंपर्यंतचा प्रवास साधा नव्हताच. कधी संघात संधी तर कधी डच्चू... असाच कायम प्रवास संजूचा राहिलाय. एक-दोन संधी मिळाल्या खऱ्या पण त्याला कमाल दाखवता आली नाही. सध्या संजू तगड्या फॉर्ममध्ये आहे. राजस्थानला अशक्य असे विजय मिळवून देतोय. तर त्याची बॅटवर धावा देखील कोरल्या जात आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) देखील संजूची पुन्हा दखल घेतली अन् टीम इंडियामध्ये त्याचं स्थान निश्चित केलं.
एवढ्या टॅलेन्टेड खेळाडूंना एका 15 जणांच्या टीममध्ये बसवणं म्हणजे बीसीसीआयसाठी तारेवरची कसरत... मात्र, यात देखील संजूने बाजी मारलीये. केएल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर संजूला स्थान मिळालं. विकेटकिपिंग आणि फलंदाजीत राहुलपेक्षा संजू उजवा ठरलाय. मागील 2022 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला संजूला टीम इंडियामध्ये स्थान मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, तिथं नारळ मिळाला. त्यानंतर 2023 च्या वनडे वर्ल्ड कपला संजूच्या नावाची जोरदार चर्चा झाली. तिथंही सिलेक्शन नाही. अशा परिस्थिती संजू खचला नाही. त्याने पुन्हा मैदान गाठलं अन् तयारी सुरू केली.
संजूने राजस्थानची टीम गुंडाळली अन् नव्याने खेळाडूंची पसंती केली. यंदाच्या हंगामात त्याचा निकाल दिसून आलाय. आत्तापर्यंत 9 पैकी 8 सामने राजस्थानने जिंकले आहेत. योग्य नियोजन आणि स्मार्ट कॅप्टन्सीच्या जोरावर संजूने 8 सामने जिंकले. संजू स्वत: खोऱ्याने धावा काढतोय. संजूने 9 सामन्यात 385 धावा केल्या आहेत. त्यात त्याता स्टाईक रेट 161 आहे. सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा 6 वा नंबर लागतोय.
T-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.