'धोनीचं सॉफ्टवेअर ठीक, पण हार्डवेअरमध्ये गडबड'

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतानं टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.

Updated: Jan 21, 2019, 04:18 PM IST
'धोनीचं सॉफ्टवेअर ठीक, पण हार्डवेअरमध्ये गडबड' title=

मुंबई : नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतानं टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. भारताला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज आणि द्विदेशीय वनडे सीरिज जिंकण्यात यश आलं. यातल्या वनडे सीरिजमधल्या भारताच्या विजयाचा हिरो महेंद्रसिंग धोनी होता. या सीरिजमध्ये धोनी फक्त फॉर्ममध्येच आला नाही, तर त्यानं बऱ्याच कालावधीनंतर फिनिशरची भूमिकाही पार पाडली. धोनीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही वनडे मॅचमध्ये अर्धशतकं केली. यातल्या २ मॅचमध्ये भारताचा विजय झाला.

धोनीचं सॉफ्टवेअर ठीक आहे, त्याच्या हार्डवेअरमध्ये गडबड असल्याची प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी दिली आहे. ते ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलत होते. कामगिरीच्या बाबतीत धोनी त्याच्या 'सर्वोत्तम फॉर्म'मध्ये नाहीये. त्याचं सॉफ्टवेअर म्हणजेच त्याचा इरादा आणि त्याचं डोकं अजूनही शानदार आहे. तो मैदानात काय करतोय हे त्याला माहिती आहे. पण त्याचं हार्डवेअर सॉफ्टवेअरशी ताळमेळ बसवत नाही, असं वक्तव्य संजय मांजरेकर यांनी केलं. हार्डवेअर म्हणजे संजय मांजरेकर यांना धोनीच्या फिटनेसविषयी भाष्य करायचं होतं.

'धोनी आता तसा नाही'

धोनीचं हार्डवेअर आता ५-१० वर्षांआधी सारखं राहिलं नाही. तेव्हा धोनी पाहिजे तेव्हा सिक्स मारत होता. आता धोनीमध्ये ती क्षमता आणि विश्वास दिसला नाही पण तो आताही शेवटपर्यंत टिकण्याचा मार्ग शोधून काढतो, अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी दिली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये धोनीनं ९६ बॉलमध्ये ५१ रनची खेळी केली. पण या खेळीनंतरही भारताचा पराभव झाला. धोनीच्या संथ खेळीमुळेच भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याची टीकाही करण्यात आली. पहिल्या मॅचमध्ये भारताचा ३४ रननी पराभव झाला. २८९ रनचा पाठलाग करताना भारतानं पहिल्या ४ ओव्हरमध्ये ४ रनवर ३ विकेट गमावल्या होत्या. यानंतर भारतीय टीमवर दबाव होता. रोहित शर्मानं त्या मॅचमध्ये शतक केलं होतं.

शेवटच्या दोन मॅचमध्ये धोनीचा करिश्मा

यानंतर दुसऱ्या दोन्ही मॅचमध्ये धोनीनं नाबाद अर्धशतकं झळकावली आणि भारताला विजय मिळवून दिला. भारताचा विजय होईपर्यंत धोनी मैदानात टिकून राहिला. दुसऱ्या मॅचमध्ये धोनीनं ५४ बॉलमध्ये नाबाद ५५ रन केले. तर तिसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ११४ बॉलमध्ये नाबाद ८७ रनची खेळी केली.

तिन्ही मॅचमध्ये अर्धशतक केलेल्या धोनीला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. ३७ वर्ष आणि १९५ दिवसाचं वय असताना मॅन ऑफ द सीरिज मिळवणारा धोनी हा सगळ्यात बुजुर्ग क्रिकेटपटू बनला आहे. धोनीच्याआधी हे रेकॉर्ड सुनिल गावसकर यांच्या नावावर होतं. धोनीचा वनडे क्रिकेटमधला हा सातवा मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार आहे.