कॉमेंट्रीमधून डच्चू मिळाल्यावर संजय मांजरेकर चेन्नई सुपरकिंग्सकडून ट्रोल

भारतीय क्रिकेटचे नावाजलेले कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांना बीसीसीआयने कॉमेंट्री पॅनलवरून डच्चू दिला आहे.

Updated: Mar 15, 2020, 09:38 PM IST
कॉमेंट्रीमधून डच्चू मिळाल्यावर संजय मांजरेकर चेन्नई सुपरकिंग्सकडून ट्रोल title=

मुंबई : भारतीय क्रिकेटचे नावाजलेले कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांना बीसीसीआयने कॉमेंट्री पॅनलवरून डच्चू दिला आहे. भारत-दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या वनडेवेळी संजय मांजरेकर दिसले नव्हते, त्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. बीसीसीआय संजय मांजरेकरांच्या कामावर खुश नव्हती, असं बोललं जातंय.

मागच्या वर्षी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान मांजरेकर ऑलराऊंडर रविंद्र जडेजासोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आले होते. मांजरेकर यांनी जडेजाचा उल्लेख बिट्स ऍण्ड पीसेस खेळाडू असा केला होता. मांजरेकरांच्या या टीकेला जडेजानेही प्रत्युत्तर दिलं होतं.

जडेजाची मांजरेकरांवर बोचरी टीका

आयपीएलची टीम असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सने संजय मांजरेकर यांना ट्रोल केलं आहे. 'आता ऑडिओ फिड बिट्स ऍण्ड पीसेस मध्ये ऐकायची गरज नाही,' असं ट्विट चेन्नई सुपरकिंग्सच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.

भारत आणि बांगलादेशमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्ट मॅचदरम्यानही संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले यांच्यात कॉमेंट्री सुरु असतानाच वाद झाले होते. हर्षा भोगलेंना गुलाबी बॉलविषयी जास्त माहिती नाही कारण ते क्रिकेट खेळलेले नाहीत, असं मांजरेकर म्हणाले होते. काहीच दिवसांपूर्वी संजय मांजरेकर यांनी हर्षा भोगलेंची माफी मागितली होती.

हर्षा भोगलेंबाबत केलेल्या वक्तव्यावर मांजरेकरांची माफी

'कॉमेंट्री करणं हे काम माझ्यासाठी नेहमी अधिकाराचं नाही तर सन्मानाचं होतं. मला कॉमेंट्रीवर ठेवायचं का नाही, हे मला नोकरी देणाऱ्यांवर आहे, मी नेहमीच याचा सन्मान करेन. बीसीसीआय माझ्या कामगिरीवर खुश नसेल. मी याचा स्वीकार करतो,' असं ट्विट संजय मांजरेकर यांनी केलं आहे.