मुंबई : भारतीय क्रिकेटचे नावाजलेले कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांना बीसीसीआयने कॉमेंट्री पॅनलवरून डच्चू दिला आहे. पदावरुन हटवल्यानंतर संजय मांजरकेर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. भारत-दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या वनडेवेळी संजय मांजरेकर दिसले नव्हते, त्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. बीसीसीआय संजय मांजरेकरांच्या कामावर खुश नव्हती, असं बोललं जातंय. आता मांजरेकर यांनी ट्विट करुन आपलं मौन सोडलं आहे.
'कॉमेंट्री करणं हे काम माझ्यासाठी नेहमी अधिकाराचं नाही तर सन्मानाचं होतं. मला कॉमेंट्रीवर ठेवायचं का नाही, हे मला नोकरी देणाऱ्यांवर आहे, मी नेहमीच याचा सन्मान करेन. बीसीसीआय माझ्या कामगिरीवर खुश नसेल. मी याचा स्वीकार करतो,' असं ट्विट संजय मांजरेकर यांनी केलं आहे.
I have always considered commentary as a great privilege, but never an entitlement. It is up to my employers whether they choose to have me or not & I will always respect that. Maybe BCCI has not been happy with my performance of late. I accept that as a professional.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) March 15, 2020
मागच्या वर्षी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान मांजरेकर ऑलराऊंडर रविंद्र जडेजासोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आले होते. मांजरेकर यांनी जडेजाचा उल्लेख बिट्स ऍण्ड पीसेस खेळाडू असा केला होता. मांजरेकरांच्या या टीकेला जडेजानेही प्रत्युत्तर दिलं होतं.
भारत आणि बांगलादेशमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्ट मॅचदरम्यानही संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले यांच्यात कॉमेंट्री सुरु असतानाच वाद झाले होते. हर्षा भोगलेंना गुलाबी बॉलविषयी जास्त माहिती नाही कारण ते क्रिकेट खेळलेले नाहीत, असं मांजरेकर म्हणाले होते. काहीच दिवसांपूर्वी संजय मांजरेकर यांनी हर्षा भोगलेंची माफी मागितली होती.
कोरोनामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या शेवटच्या २ वनडे रद्द करण्यात आला. धर्मशालामधली पहिली वनडे पावसामुळे होऊ शकली नाही. पहिल्या मॅचदरम्यान मांजरेकर कॉमेंट्री पॅनलमध्ये दिसले नव्हते.