MI vs RCB : परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...MI कडून यंदाचीही पहिली मॅच देवाला, बंगळूरूचा दणक्यात विजय

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 172 रन्सच्या टारगेचा पाठलाग करताना आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ ड्यू प्लेसिस मैदानावर उतरले होते. या दोघांनीही मुंबईच्या फलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

Updated: Apr 2, 2023, 11:12 PM IST
MI vs RCB : परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...MI कडून यंदाचीही पहिली मॅच देवाला, बंगळूरूचा दणक्यात विजय title=

MI vs RCB : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांच्या पराभवाची परंपरा कायम ठेवली आहे. मुंबईला यंदाच्या वर्षी देखील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर बंगळूरूने (Royal Challengers Bangalore) मुंबईचा 8 विकेट्सने पराभव केलाय. या विजयासह आरसीबीने सिझनची सुरुवात सामना जिंकून केली आहे. आरसीबीचे ओपनर विराट कोहली आणि फाफ ड्यु प्लेसिस या दोघांनी मिळून मुंबईच्या फलंदाजांची धुलाई केलीये.

विराट-फाफने गोलंदाजांना धुतलं

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 172 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करताना आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ ड्यू प्लेसिस मैदानावर उतरले होते. या दोघांनीही मुंबईच्या फलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यावेळी विराटने नाबाद 82 तर फाफने 73 रन्सची खेळी केली. या दोघांनीही पहिल्याच ओव्हरपासून तुफान खेळी करत मुंबईच्या नाकीनऊ आणल्या. अखेर पराभवाच्या छायेत असताना अर्शद खानने फाफची विकेट काढली. फाफची विकेट गेल्यानंतर दिनेश कार्तिक मैदानात उतरला होता. मात्र कार्तिकला पहिल्या सामन्यात भोपळाही फोडता आलेला नाही.

मुंबईच्या तिलक वर्माची खेळी व्यर्थ

मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडू तिलक वर्माने 46 बॉल्समध्ये नाबाद 84 रन्स केले. वर्माच्या या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या गाठण्यास मदत मिळाली. मुंबई फलंदाजी करत असताना एका बाजूने विकेट्स सतत पडत होत्या. मात्र तिलकने दुसरी बाजू सांभाळून धरली होती. शेवटच्या बॉलवर वर्माने हर्षल पटेलला सिक्स लगावला. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावून 171 रन्स केले. 

मुंबईच्या फलंदाजांची खराब खेळी

मुंबईच्या टीमने 7 विकेट्स गमावत 171 रन्स केले आणि आरसीबीला जिंकण्यासाठी 172 रन्सचं आव्हान दिलं. आजच्या पहिल्याच सामन्यात मुंबईच्या चार फलंदाजांना केवळ दुहेरी धावसंख्या गाठता आली. यंदाच्या लीलावातील सर्वात महागडा खेळाडू कॅमेरून ग्रीन अवघ्या 5 रन्सवर बाद झाला. तर टीम डेव्हिडने 10 बॉल्समध्ये 4 आणि कर्णधार रोहित शर्माने 1 रन केला. याशिवाय निहाल बधेराने 13 बॉल्समध्ये 21, सूर्यकुमार यादवने 16 बॉल्समध्ये 15, इशान किशनने 13 बॉल्समध्ये 10 तर अर्शद खानने नऊ बॉल्समध्ये नाबाद 15 रन्स केले.