IPL 2023: आयपीएलचा सोळावा सिझन (IPL 2023) उद्यापासून सुरु होणार आहे. 31 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यामध्ये रंगणार आहे. दरम्यान लीग सुरु होण्यापूर्वी सर्व टीमच्या कर्णधारांचा ट्रॉफीसोबत फोटो काढण्यात आला. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) चाहते नाराज झालेत. कारण या फोटोमध्ये केवळ 9 कर्णधार असून रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र अनुपस्थितीत आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा आयपीएल खेळणार की नाही हा मोठा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
16 व्या सिझनचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला जाणार आहे. गतविजेत्या गुजरातला 5 वेळा चॅम्पियन्स असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध खेळायचं आहे. दरम्यान लीगला सुरुवात करण्यापूर्वी सर्व कर्णधारांचं आयपीएलच्या ट्रॉफीसोबत फोटोशूट झालं. मात्र या फोटोमधून सर्वात लोकप्रिय असलेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मात्र गायब होता.
केन विलियम्सननंतर सनरायझर्सन हैदराबादच्या टीमच्या नेतृत्वाची धुरा एडन मार्करमकडे देण्यात आली. मात्र एडन मार्करम अजून भारतात आला नसल्याने त्याच्या जागी सनरायझर्सनचा भुवनेश्वर कुमारने फोटोमध्ये सहभाग घेतला. मात्र यामध्ये मुंबई इंडियन्सचा एकही खेळाडू किंवा कर्णधार रोहित शर्मा दिसून न आल्याने चाहते मात्र गोंधळले आहेत.
सर्व कर्णधारांचा हा फोटो सोशल मीडिया व्हायरल झाला. या फोटोनंतर काही वेळाने रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसला. ज्यामध्ये तो एका शूटसाठी व्यस्त असल्याचं दिसून आला. त्यामुळे असा, अंदाज लावला जातोय की, या शूटमुळे व्यस्त असल्याने कर्णधारांसोबतच्या फोटोमध्ये रोहित शर्मा उपस्थित राहू शकला नसेल. दरम्यान हेच कारण असल्याची अजून खात्री करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma IPL 2023) हंगामातील काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या हंगामातील सुरूवातीचे सामने खेळू शकणार नाही. कारण रोहित शर्मा हा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर असण्याची शक्यता आहे. दरम्यान कर्णधाराच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.