रोहित शर्मा विक्रमाजवळ, कोणताच भारतीय जवळपासही नाही

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या टी-२० सीरिजला उद्यापासून सुरुवात होत आहे.

Updated: Dec 5, 2019, 10:44 AM IST
रोहित शर्मा विक्रमाजवळ, कोणताच भारतीय जवळपासही नाही title=

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या टी-२० सीरिजला उद्यापासून सुरुवात होत आहे. या सीरिजमध्ये रोहित शर्माला विक्रम करण्याची संधी आहे. या रेकॉर्डपासून रोहित फक्त १ पाऊल दूर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० सिक्सचा टप्पा गाठायला रोहितला फक्त १ सिक्सची गरज आहे. ही सिक्स मारल्यानंतर रोहित हा ४०० सिक्स मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक सिक्सचा विक्रम आहे. गेलने एकूण तिन्ही फॉरमॅट मिळून ५३४ सिक्स मारले आहेत. तर पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने ४७६ सिक्स लगावले.

भारतीय क्रिकेटपटूंमध्ये रोहितचे तिन्ही फॉरमॅटमध्ये ३९९ सिक्स झाले आहेत. धोनी हा ३५९ सिक्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनी आणि रोहित या दोनच भारतीय खेळाडूंना ३०० पेक्षा जास्त सिक्स लगावता आल्या आहेत. रोहितच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २,५३९ रन करण्याचा विश्वविक्रमही आहे.

सर्वाधिक सिक्स मारण्याऱ्या भारतीयांमध्ये सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत २६४ सिक्स लगावले. तर युवराज सिंगने २५१ आणि सौरव गांगुलीने २४७ सिक्स मारले. सेहवागने २४३ आणि विराटने १९९ सिक्स मारले आहेत.

रोहित शर्माच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम आहे. रोहितने टी-२० मॅचमध्ये ११५ सिक्स मारले आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने वनडेमध्ये २३२ सिक्स मारले आहेत. शाहिद आफ्रिदी (३५१ सिक्स) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. क्रिस गेल (३३१ सिक्स) आणि सनथ जयसूर्या (२७० सिक्स) दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रोहितने ३२ टेस्ट मॅचमध्ये ५२ सिक्स मारले आहेत. एकूण टेस्ट मॅचपेक्षा जास्त सिक्स मारणाऱ्या ठराविक खेळाडूंमध्ये रोहित मोडतो.