मुंबई : टी-20 संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा नशिबाच्या घोड्यावर स्वार आहे असं म्हणण्यास हरकत नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने टॉस जिंकला आणि सामनाही जिंकला. त्याने रांचीमध्ये जिंकून पहिली टी-20 मालिकाही जिंकली आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवरही रोहित शर्मा प्रत्येक सामन्यात नवनवे विक्रम करतोय. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा तिसरा क्रमांकाचा खेळाडूही बनलाय.
रोहित शर्माने कसोटी, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 450 सिक्सचा टप्पा ओलांडला आहे. रोहित अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय आणि एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या कालच्या सामन्यात रोहितने चौथ्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर डीप स्केवअर लेगला सिक्स खेचला. यासह रोहितचे 450 सिक्स पूर्ण झाले.
रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामी जोडीने टीम इंडियाला शानदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी 117 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी अर्धशतकी खेळी केली. केएलने 49 चेंडूत 6 फोर आणि 2 सिक्स खेचले. तर रोहितने 36 चेंडूत 5 सिक्स आणि 1 फोरसह 55 धावांची खेळी केली.
रोहित शर्मा आता T-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू बनला आहे. हा त्याचा 29वा 50 अधिक स्कोर होता. आता तो विराट कोहलीच्या बरोबरीत पोहोचला आहे. या मालिकेत विराटला विश्रांती देण्यात आली आहे. रोहितने T-20 मध्ये चार शतकं झळकावली आहेत.
सतत टॉस हरल्याने त्रस्त असलेल्या विराट कोहलीच्या उलट रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये टॉस जिंकलाय. यावेळीही दव प्रभाव पाहून रोहितने प्रथम फिल्डींगचा निर्णय घेतला. किवी संघाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावत 153 धावा केल्या. तर टीम इंडियाने 17.2 ओव्हरमध्ये 155 धावांचं लक्ष्य गाठलं.