ऋतुराज गायकवाडची IPL मध्ये खास कामगिरी, विराट आणि सेहवागची बरोबरी

विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवागची बरोबरी

Updated: Nov 1, 2020, 10:57 PM IST
ऋतुराज गायकवाडची IPL मध्ये खास कामगिरी, विराट आणि सेहवागची बरोबरी title=

दुबई : चेन्नई विरुद्ध पंजाब सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने या मोसमातील शेवटच्या तीन लीग सामन्यांमध्ये आपल्या संघासाठी आश्चर्यकारक फलंदाजी दाखवत आपली क्षमता दाखवून दिली. या मोसमात त्याने आपल्या संघासाठी एकूण 6 सामने खेळले. यापैकी त्याने पहिल्या तीन सामन्यात 0,5,0 धावा केल्या, परंतु त्यानंतरच्या पुढील तीन सामन्यात त्याने 65 *, 72 आणि 62 * धावा केल्या.

या तीन सामन्यांत त्याच्या सर्वोत्तम खेळीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच पदवी देण्यात आली. सीएसकेने शेवटचे तीन लीग सामनेही जिंकले. मागील लीग सामन्यात ऋतुराज गायकवाडने आरसीबीविरूद्ध नाबाद 65, केकेआरविरुद्ध 72 धावा आणि पंजाबविरुद्ध नाबाद 62 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड सलग तीन सामन्यात सामनावीर ठरल्याने त्याने विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली.

आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त तीन भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी सलग तीन सामन्यात तीन वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकला आहे. ऋतुराज गायकवाडच्या आधी वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांना हा मान मिळाला आहे. ऋतुराज असे करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट आणि सेहवागसह या या स्पेशल क्लबमध्ये तो सामील झाला आहे.

या लीगमधील सीएसकेकडून तीन सामन्यात सलग तीन अर्धशतके ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. पंजाबविरुद्धच्या या सामन्यात ऋतुराजने नाबाद 62 धावा करत संघाला 9 गडी राखून विजय मिळवून दिला. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 153 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सीएसकेने 18.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमवत 154 रन केले.