'अरे घे ना DRS'! रिव्ह्यू घेण्यासाठी पंतने रोहितचं मन वळवलं आणि...

दुसऱ्या सामन्यात श्रीलंका फलंदाजी करत असताना एक रंजक घटना घडली. 

Updated: Mar 13, 2022, 10:50 AM IST
'अरे घे ना DRS'! रिव्ह्यू घेण्यासाठी पंतने रोहितचं मन वळवलं आणि... title=

बंगळूरू : भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळला जातोय. पहिला टेस्ट सामना भारताने जिंकला त्यामुळे आता दुसरा सामनाही जिंकून सिरीज जिंकण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यात श्रीलंका फलंदाजी करत असताना एक रंजक घटना घडली. 

झालं असं की, भारतीय कर्णधार रोहित शर्माला रिव्ह्यू घ्यायचा नव्हता. पण, विकेटकीप ऋषभ पंतने आग्रह केला आणि त्यानंतर रोहितने रिव्ह्यू घेतला, जो यशस्वी ठरला. यानंतर सोशल मीडियावर ऋषभ पंतचं प्रचंड कौतुक होताना दिसतंय. 

ही संपूर्ण घटना 12व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर घडली. मोहम्मद शमीने फेकलेला बॉल धनंजय डी सिल्वाच्या पॅडला लागला. त्यानंतर सर्वांनी जोरदार अपील केले. पण मैदानावरील अंपायरने अपील फेटाळून लावलं. यानंतर पंतने कर्णधार रोहितकडे रिव्ह्यू घेण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी रोहित शर्मा रिव्ह्यू घेण्यासाठी तयार नव्हता. 

मात्र पंतने रोहितला रिव्ह्यू घेण्यासाठी त्याचं मन वळवलं. रिव्ह्यूमध्ये चेंडू विकेटला लागल्याचं दिसत होतं आणि बॅटचा बॉलशी संपर्कही होत नव्हता. अशा परिस्थितीत मैदानावरील अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. आणि भारताला विकेट मिळाली.

टीम इंडियाचा पहिला डाव 252 रन्समध्ये आटोपला. श्रीलंकेचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात 6 बाद 86 धावा केल्या होत्या. निरोशन डिकवेला 13 आणि लसिथ एम्बुल्डेनिया शून्य रन्सवर खेळत आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 3 आणि मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या डावात श्रीलंकेची टीम अजूनही 166 रन्सने मागे आहे.