...तर रवींद्र जडेजा कपिल देव-सचिनच्या यादीत जाणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा शानदार विजय झाला. 

Updated: Jan 16, 2019, 09:57 PM IST
...तर रवींद्र जडेजा कपिल देव-सचिनच्या यादीत जाणार title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा शानदार विजय झाला. कर्णधार विराट कोहलीचं शतक आणि धोनीच्या अर्धशतकामुळे भारतानं हा सामना जिंकला. या विजयाबरोबरच भारतानं ३ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये १-१नं बरोबरी साधली आहे. पहिल्या वनडेमध्ये भारताचा ३४ रननी पराभव झाला होता. त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला दुसरी वनडे जिंकणं महत्त्वाचं होतं. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरी वनडे शुक्रवार १८ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम वनडे सीरिजही जिंकेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा ऑल राऊंडर रवींद्र जडेजाला सचिन तेंडुलकर आणि कपिल देव या खेळाडूंच्या यादीत जाऊन बसण्याची संधी मिळू शकते. हे रेकॉर्ड करण्यासाठी रवींद्र जडेजाला फक्त १० रनची आवश्यकता आहे. वनडे क्रिकेटमध्ये २ हजार रन पूर्ण करण्यासाठी जडेजाला १० रनची गरज आहे. या १० रन केल्या तर जडेजा वनडे क्रिकेटमध्ये २ हजार रन आणि १५० विकेट घेणारा भारताचा तिसरा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला २६वा ऑल राऊंडर ठरेल.

कपिल देव यांनी २२५ वनडेमध्ये ३,७८३ रन आणि २५३ विकेट घेतल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरनं ४६३ मॅचमध्ये १८.४२६ रन आणि १५४ विकेट घेतल्या. जडेजाच्या खात्यात आत्तापर्यंत १४६ मॅचमध्ये १९९० रन आणि १७१ विकेट आहेत.

दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा शानदार विजय झाला. विराट कोहली आणि धोनी हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. विराट कोहलीनं १०८ बॉलमध्ये १०४ रनची खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. ऑस्ट्रेलियानं ठेवलेल्या २९९ रनचा पाठलाग करताना विराट भारताला सामना जिंकवून देईल असं वाटत असतानाच रिचर्डसननं त्याची विकेट घेतली. 

विराट कोहलीची विकेट गेल्यानंतर विजयाची सगळी जबाबदारी महेंद्रसिंग धोनीनं उचलली. धोनीनं खास त्याच्या शैलीमध्येच भारताला विजय मिळवून दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारून धोनीनं भारताला विजयाजवळ नेलं. यानंतर एक रन काढून धोनीनं भारताला जिंकवून दिलं. या मॅचमध्ये भारताचा ६ विकेट आणि ४ बॉल राखून विजय झाला. धोनीनं ५४ बॉलमध्ये ५५ रनची खेळी केली. यामध्ये २ सिक्सचा समावेश होता.

एक शतक ५ रेकॉर्ड, नवीन वर्षातही विराट सुसाट!