रवी शास्त्रींचं पुन्हा प्रशिक्षक होणं जवळपास निश्चित

टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक कोण होणार? यावर गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच चर्चा सुरु होत्या.

Updated: Aug 6, 2019, 09:06 PM IST
रवी शास्त्रींचं पुन्हा प्रशिक्षक होणं जवळपास निश्चित title=

मुंबई : टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक कोण होणार? यावर गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच चर्चा सुरु होत्या. पण आता प्रशासकीय समितीने प्रशिक्षक निवडीसाठी नियुक्त केलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने याबाबतीत संकेत दिले आहेत. क्रिकेट सल्लागार समिती परदेशी प्रशिक्षक निवडीच्या विचारात नाहीत, त्यामुळे रवी शास्त्री यांचीच पुन्हा प्रशिक्षक म्हणून निवड होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. प्रशासकीय समितीने तीन सदस्यांची क्रिकेट सल्लागार समिती नियुक्त केली आहे, या समितीमध्ये कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी हे माजी खेळाडू आहेत.

आयएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य म्हणाला, 'रवी शास्त्रींच्या प्रशिक्षणामध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे रवी शास्त्री पुन्हा टीम इंडियाचे प्रशिक्षक होऊ शकतात.'

'आम्ही परदेशी प्रशिक्षक निवडीच्या विचारात नाही. जर गॅरी कर्स्टन यांच्यासारख्या व्यक्तीने या पदासाठी अर्ज केला असता, तर आम्ही विचार केला असता. पण भारतीय प्रशिक्षक हीच आमची प्राथमिकता होती. त्यामुळे सध्याच्या प्रशिक्षकांसोबत टीम चांगली कामगिरी करत आहे, तर बदलाचा विचार करण्यात काय अर्थ आहे,' असं वक्तव्य समितीच्या सदस्याने केलं, त्यामुळे रवी शास्त्रींचा मार्ग मोकळा झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी कर्णधार विराट कोहलीनेही रवी शास्त्रींना पुन्हा प्रशिक्षक बनवण्याचं समर्थन केलं होतं. तर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही टीम बदलामधून जात असल्यामुळे सध्या प्रशिक्षक बदलणं उचित नसल्याचं सांगितलं होतं. वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा करार संपला होता, पण लगेचच वेस्ट इंडिज दौरा असल्यामुळे त्यांचा करार ४५ दिवसांनी वाढवण्यात आला.

प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्यांच्या मुलाखती कधी होणार याची तारीख अजून निश्चित झाली नाही. याबाबत लवकरच क्रिकेट सल्लागार समितीला सूचना दिली जाईल. पण ऑगस्टच्या मध्यात मुलाखती होतील, असं प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितलं.