रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना शनिवारी रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत पावसाची शक्यता व्यक्त केलीये. शुक्रवारी दुपारीही रांचीमध्ये जोरदार पाऊस झाला.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याचे रांचीसह संपूर्ण राज्यात ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण तसेच मध्य भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलाय.
शुक्रवारी दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत रांचीमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण मैदान कव्हर करण्यात आले होते. मैदान पूर्ण कव्हर केल्यानंतरही मैदान काही ठिकाणी ओले झालेच. शुक्रवारी दीड वाजल्यापासून भारतीय संघ मैदानात सराव करणार होता. मात्र पावसामुळे सराव रद्द करण्यात आला आणि त्यात इनडोअर सराव करावा लागला.
याआधी ऑक्टोबर २०१३मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे या सामन्यात पूर्ण ४० षटकांचा खेळ पाहता येईल अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केलीये.