IND vs AUS : 'मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर पळत गेलो अन्...', आश्विनने सांगितला विराटच्या सुटलेल्या कॅचचा किस्सा!

R Ashwin On Virat Kohli : विराट कोहली जेव्हा मैदानात होता, तेव्हा आम्हाला विजयाची आशा होती. कोहलीचा कॅच जेव्हा हवेत गेलेला पाहिला, तेव्हा...  

Updated: Oct 9, 2023, 03:53 PM IST
IND vs AUS : 'मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर पळत गेलो अन्...', आश्विनने सांगितला विराटच्या सुटलेल्या कॅचचा किस्सा! title=
R Ashwin told the story of dressing room after Virat's catch missed by Mitchell Marsh

India vs Australia : चेन्नईच्या चेपॉकवर विराटच्या बॅटमधून उडालेला बॉल हवेत होता अन् स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हृदयाचे ठोके झटकन वाढले. कोणी डोक्याला हात लावला तर कोणी डोळे झाकले. विराटला आपली चूक कळाली अन् त्याने देखील आशा सोडून दिल्या. त्याचवेळी खेळ पलटला अन् मिशेल मार्शच्या (Mitchell Marsh) हातातून कॅच सुटला. स्टेडियमवर एकच जल्लोष सूरू झाला. अनेकांना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. विराटने (Virat Kohli) देखील सुटकेचा श्वास घेतला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने एका चुकीमुळे सामना गमावला अन् भारताने कांगारूंची दादागिरी मोडून काढली.

भारताने विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य 4 गडी गमावून पूर्ण केलं. विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी शानदार खेळी करत भारताला विजयाकडे नेलं. विराटने 85 धावांची तर राहुलने 97 धावांची खेळी खेळली. विराट कोहलीला सामन्याच्या 8 व्या ओव्हरमध्ये पुन्हा एक संधी मिळाली होती. त्यावेळी ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यावर आर आश्विन (Ravichandran Ashwin) याने मोठं वक्तव्य केलंय.

नेमकं काय म्हणाला R Ashwin ? 

विराट कोहली जेव्हा मैदानात होता, तेव्हा आम्हाला विजयाची आशा होती. विराट कोहलीचा कॅच जेव्हा हवेत गेलेला पाहिला, तेव्हा मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर पळत आलो. मी विचार केला, आता आपला खेळ संपला. त्यावेळी मी ड्रेसिंग रूममध्ये परत गेलो. तेव्हा मला प्रेक्षकांच्या ओरडण्याचा आवाज आला. काय झालं मला कळेना, मी पाहिलं तर विराटचा कॅच सुटला होता. त्यानंतर मी कुठंही गेलो नाही. मी त्याच ठिकाणी मॅच संपेपर्यंत थांबलो. त्यामुळे आता माझे पाय दुखत आहेत, असं आश्विनने सांगितलं.

सामन्यात नेमकं काय झालं होतं?

जॉश हेझलवूड सामन्याच्या 8 व्या ओव्हरसाठी गोलंदाजी करत होता. यावेळी ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कोहलीने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॉल हवेत गेला. यावेळी विकेटकीपर अॅलेक्स कॅरी आणि फिल्डींग करणारा मिचेल मार्श बॉल पकडण्यासाठी धावला. मात्र बॉलपर्यंत पोहोचूनही मार्शला कॅच पकडता आला नाही. अॅलेक्स कॅरीसाठी कॅच सोपा झाला असता. मात्र, दोन्ही खेळाडूंमध्ये संवाद न झाल्याने ऑस्ट्रेलियाकडून मोठी चूक झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सामना गमवावा लागला.