Qatar vs Ecuador FIFA World Cup 2022 : पहिल्याच सामन्यात इक्वेडोरनं यजमान कतारला चारली धुळ

FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कपची सुरुवात झाली आणि या फुटबॉलच्या महाकुंभात पहिल्याच सामन्यात यजमानांना इक्वेडोरपुढे शरणागती पत्कराली लागली. 

Updated: Nov 21, 2022, 07:18 AM IST
Qatar vs Ecuador FIFA World Cup 2022 : पहिल्याच सामन्यात इक्वेडोरनं यजमान कतारला चारली धुळ  title=
Qatar vs Ecuador FIFA World Cup 2022 match highlights and results

FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup 2022) ची मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या या स्पर्धेमध्ये उदघाटपर पहिल्याच सामन्यात यजमान असणाऱ्या कतारच्या (Qtar) संघाला पराभव पचवावा लागला. 20 नोव्हेंबरला दोहाच्या अल बायत स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ग्रुप- A च्या सामन्यामध्ये इक्वेडोरच्या (Ecuador) संघानं कतारवर 2-0 ने मात केली. या विजयाचं श्रेय संघाचा कर्णधार  एननर वालेंसियाला जातं. कारण, त्यानंच इक्वेडोरच्या वतीनं 2 गोल केले. तर, कतारचे खेळाडू गोल करणं तर दूर पण तो गोल रोखूही शकले नाहीत. (Qatar vs Ecuador FIFA World Cup 2022 match highlights and results)

पहिल्या सत्रापासूनच कतारची नमती भूमिका 

इक्वेडोरनं सामन्याची सुरुवातच अगदी तुफानी अंदाजात केली.  एननर वॅलेंसियानं (enner valencia) सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला गोल केला. पण VAR (वीडियो असिस्टंट रेफ्रीनं) मात्र हा गोल बाद ठरवला. त्यानंतर वॅलेंसियानं पुन्हा 16 मिनिटाला संघाच्या वतीनं पहिला गोल (Goal) केला. पेनल्टीमुळं त्याला हा गोल करता येणं शक्य झालं. या सामन्यादरम्यान कतारच्या गोलकीपरला यलो कार्डही देण्यात आलं. 

वाचा : फिफा वर्ल्ड कप 2018: इंग्लंडच्या कर्णधाराने जिंकला गोल्डन बूट

इतक्यावरच न थांबता वॅलेंसियानं आणखी एक गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानं हा गोल 31 व्या मिनिटाला गेला. उत्कृष्ट हेडर देत त्यानं हा गोल मारला आणि फुटबॉलप्रेमी पाहतच राहिले. तिथे कतारचा संघ पिछाडीवर असतानाच इक्वेडोरचा आक्रमक खेळ काही केल्या थांबत नव्हता. 

दुसऱ्या सत्रात कोणत्याही संघाकडून गोल नाही 

दुसऱ्या सत्रामध्ये कतारच्या संघाकडून काही प्रसंगी गोल करण्याचा प्रयत्न झाला. पण, इक्वेडोरच्या संघानं मात्र त्यांना चांगलंच रोखून धरलं होतं. या पराभवामुळं आता यजमान कतार संघच संकटात आला आहे. कारण, येत्या काळात संघाला सेनेगल, नेदरलँड यांसारख्या भक्कम संघांशी लढत द्यावी लागणार आहे. 

सामन्यात रचले गेले काही विक्रम 

फिफाच्या (Fifa History) आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं, की यजमान संघ त्यांचा पहिला सामना हरला. अखेरच्या वेळी जेव्हा कतार आणि इक्वेडोर एकमेकांशी भिडले होते, त्यावेळी 4-3 च्या फरकानं कतारनं सामना खिशात टाकला होता. पण, यावेळी मात्र दिवस इक्वेडोरनं गाजवला.