मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले आहेत. आगामी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारताच्या काही माजी क्रिकेटपटूंनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीचा समावेश आहे. क्रिकेटच नाही, तर सगळ्या खेळांमध्ये पाकिस्तानशी संबंध तोडा, असं गांगुली म्हणाला होता. तसंच वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध न खेळताही भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकू शकते, असा विश्वास सौरव गांगुलीनं व्यक्त केला होता.
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध एक मॅच खेळली नाही, तरी भारताच्या वर्ल्ड कप विजयामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. पण भारताचा पाकिस्तानला होणारा विरोध सांकेतिक असता कामा नये. जर वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सेमी फायनल किंवा फायनलमध्ये समोरासमोर आले, तर भारताची न खेळण्याची भूमिका कायम राहावी. 'हा वर्ल्ड कप १० टीममध्ये खेळवला जाईल. प्रत्येक टीम दुसऱ्या टीमसोबत एकदा खेळणार आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानविरुद्ध खेळला नाही, तरी पुढच्या फेरीमध्ये जायला भारताला कोणतीच अडचण येणार नाही', असं गांगुली म्हणाला.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं मात्र वेगळीच भूमिका मांडली. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध न खेळून त्यांना फुकटचे २ गुण का द्यायचे? त्यापेक्षा ही मॅच जिंकून त्यांना वर्ल्ड कप बाहेर करण्याचा प्रयत्न करा, असं सचिन म्हणाला होता. यावर 'सचिनला फक्त २ गुण हवे आहेत, पण मला भारतानं वर्ल्ड कप जिंकलेला हवा आहे', अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीनं दिली होती.
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या या वेगवेगळ्या मतांमुळे सोशल मीडियावर दोघं एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत, असं चित्र बनवलं गेलं, पण सौरव गांगुलीनं या सगळ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 'माध्यमांमधली अनेक जण माझं वक्तव्य सचिनच्याविरोधी असल्याचं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वर्ल्ड कप हवा आहे, या माझ्या उत्तराचा सचिनच्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही. तसंच माझं हे वक्तव्य सचिनच्याविरोधीही नाही. तो माझा २५ वर्ष जुना मित्र होता, आहे आणि राहिल', असं ट्विट सौरव गांगुलीनं केलं.
Never felt the need for you to justify. Strongly believe that all of us want what’s best for our nation. https://t.co/zUZYBVlCdh
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 24, 2019
सौरव गांगुलीच्या या ट्विटला सचिन तेंडुलकरनंही उत्तर दिलं आहे. 'याबद्दल तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. देशासाठी जे चांगलं आहे तेच व्हावं, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे', असं सचिन म्हणाला.