राहुल-पंतला आणखी संधी देणार- विराट कोहली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला.

Updated: Feb 25, 2019, 07:41 PM IST
राहुल-पंतला आणखी संधी देणार- विराट कोहली title=

विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला. भारतानं ठेवलेल्या १२७ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आले. २०व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकला. पण भारतीय टीमच्या या कामगिरीवर आपण समाधानी असल्याचं विराट म्हणाला. तसंच २०१९ वर्ल्ड कपआधी केएल राहुल आणि ऋषभ पंतला आणखी वेळ देणार असल्याचं विराट कोहलीनं स्पष्ट केलं.

केएल राहुल यानं पहिल्या टी-२०मध्ये अर्धशतकीय खेळी करत भारतीय टीममध्ये जोरदार पुनरागमन केलं. पण पंतनं निराशाजनक कामगिरी केली. ऋषभ पंत ३ रनवर रनआऊट झाला. १२७ रनचा पाठलाग करत असताना जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाला दणके दिले आणि मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये नेली. बुमराहनं ४ ओव्हरमध्ये १६ रन देऊन ३ विकेट घेतल्या. शेवटच्या २ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६ रनची आवश्यकता होती. पण १९व्या ओव्हरमध्ये बुमराहनं केवळ २ रन दिल्या. शेवटच्या ओव्हरला १४ रनची गरज असताना उमेश यादवच्या बॉलिंगवर शेवटच्या बॉलवर ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.

'राहुल आणि ऋषभ पंत यांना आम्ही आणखी संधी देणार आहोत. राहुलनं चांगली खेळी केली. आमच्या दोघांमध्ये भागिदारीही झाली. पण आमची भागिदारी आणखी झाली असती तर भारताचा स्कोअर १५० रनपर्यंत पोहोचला असता. १५० च्या स्कोअरवर भारताला सामना जिंकता आला असता. पण ऑस्ट्रेलियानं आमच्यापेक्षा चांगला खेळ केला,' अशी प्रतिक्रिया विराटनं मॅचनंतर दिली.

भारतीय टीमच्या बॉलिंगचंही विराटनं कौतुक केलं. 'बॉलरच्या कामगिरीमुळे मी समाधानी आहे. आम्ही सामना शेवटपर्यंत खेचून आणू असं मला वाटलं नव्हतं. पण बॉल रिव्हर्स स्विंग होत असताना बुमराह जादू करू शकतो. आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या मयंक मार्कंडेनंही १७वी ओव्हर चांगली टाकली', असं वक्तव्य विराटनं केलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच यानेही बुमराहची स्तुती केली. शेवटच्या ओव्हरमध्ये बुमराहविरुद्ध खेळणं कठीण असतं. पण रन आऊटमुळेही आमचं नुकसान झालं. कठीण खेळपट्टीवर मॅक्सवेलनं चांगला खेळ केल्याचं फिंच म्हणाला.

या मॅचमध्ये २६ रन देऊन ३ विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा नॅथन कुल्टर नाईल सामनावीर ठरला. या खेळपट्टीवर बॉल बॅटवर येत नसल्याचं निरीक्षण कुल्टर नाईलनं मांडलं. 'टीमनी उत्कृष्ट कामगिरी केली. बॉल बॅटवर येत नसल्याचं आमच्या लगेचच लक्षात आलं. बीबीएलमध्ये आम्ही क्रिकेट खेळत होतो. हा सामना जिंकल्यानंतर आता सीरिज जिंकण्याचा प्रयत्न करू,' असं वक्तव्य कुल्टर नाईलनं केलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजनंतर या दोन्ही टीममध्ये ५ वनडे मॅचची सीरिज होईल. वर्ल्ड कपआधीची भारताची ही शेवटची सीरिज आहे. वनडे सीरिजनंतर आयपीएलला सुरुवात होईल. आयपीएलनंतर ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू होणार आहे.