प्रिती झिंटा भडकली, आयपीएलच्या या नियमावर झाली नाराज

आयपीएलच्या ११व्या सिझनसाठीचा लिलाव संपला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Jan 28, 2018, 09:07 PM IST
प्रिती झिंटा भडकली, आयपीएलच्या या नियमावर झाली नाराज  title=

बंगळुरू : आयपीएलच्या ११व्या सिझनसाठीचा लिलाव संपला आहे. नेहमीप्रमाणेच या लिलावामध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. तर काही दिग्गज खेळाडूंना जोरदार धक्का बसला. यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबची मालक असलेली प्रिती झिंटानं आक्रमकपणे बोली लावली.

किंग्ज इलेव्हन पंजाबला यंदाच्या वर्षी दिग्गज खेळाडूंसोबत कर्णधाराचीही गरज होती. म्हणूनच प्रिती झिंटानं पहिल्यापासूनच लिलावामध्ये मोठी बोली लावायला सुरुवात केली. पण लिलावावेळच्या आयपीएलच्या नियमांमुळे प्रिती झिंटा भडकली. याबाबत तिनं ट्विटरवरूनही नाराजी व्यक्त केली. आयपीएलमधला राईट टू मॅच कार्डचा नियम मला नकोसा वाटतो, असं ट्विट प्रिती झिंटानं केलं आहे.

आयपीएलच्या लिलावादरम्यान प्रितीनं ५ वेळा बोली लावली पण प्रत्येकवेळी दुसऱ्या टीमनं राईट टू मॅच कार्ड वापरून किंग्ज इलेव्हन पंजाबला हव्या असलेल्या खेळाडूंना विकत घेतलं. यामुळे प्रिती झिंटाचा पारा चढला.

शिखर धवनला विकत घेण्यामध्ये सुरुवातीला कोणी जास्त उत्साह दाखवला नाही. पण प्रिती झिंटामुळे धवनची बोली ५.२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. प्रितीनं लावलेल्या या शेवटच्या बोलीनंतर सनरायजर्स हैदराबादनं राईट टू मॅच कार्ड वापरुन धवनला पुन्हा विकत घेतलं.

अफगाणिस्तानचा स्पिनर राशिद खानला विकत घेण्यासाठीही प्रितीनं ९ कोटी रुपयांपर्यंत बोली लावली पण पुन्हा हैदराबादनंच राईट टू मॅच कार्डचा वापर करुन राशिदला त्यांच्या टीममध्ये घेतलं.

भारताचे स्टार स्पिनर्स युझुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्यावेळीही प्रिती झिंटाला हाच अनुभव आला. केकेआरनं राईट टू मॅच कार्ड वापरून कुलदीप यादवला ५ कोटी ८० लाख रुपयांना विकत घेतलं. कुलदीप यादवची बेस प्राईज १.५० कोटी रुपये होती.

युझुवेंद्र चहलला आरसीबीनं राईट टू मॅच कार्ड वापरून ६ कोटी रुपयांना विकत घेतलं. चहलची बेस प्राईज २ कोटी रुपये होती. चहल आणि कुलदीप हे दोघंही सध्या भारताच्या वनडे आणि टी-20 क्रिकेटचे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत.