Mumbai Indians Playoffs: इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलमधील (IPL 2023) यंदाच्या पर्वातील अगदी 14 च सामने शिल्लक राहिले आहेत. 14 व्या सामन्यानंतर 2023 चा चषक कोणता संघ जिंकणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र असं असतानाही प्ले ऑफ्सच्या (Playoffs) शर्यतीमध्ये 10 पैकी 9 संघ आहेत. आज गुजरात विरुद्ध हैदराबादच्या सामन्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. मात्र असं असतानाच सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरण्याची शक्यता किती आहे याबद्दल मुंबईच्या चाहत्यांमध्ये फारच उत्सुकता आहे. सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये मुंबई तिसऱ्या स्थानी असली तरी पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी उलाढाल होऊ शकते. मात्र मुंबईला प्ले ऑफ्समधील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी 2 गोष्टी कराव्या लागणार आहेत.
मागील वर्षी म्हणजेच 2022 च्या पर्वामध्ये मुंबईने त्यांच्या आयपीएलच्या वाटचालीमधील सर्वात सुमार कामगिरी केली होती. मुंबईचा संघ या पर्वात तळाला म्हणजे 10 व्या स्थानी राहिला होता. यंदाच्या पर्वामध्ये आतापर्यंत मुंबईने नावाला साजेशी कामगिरी केली नसली तरी त्यांची कामगिरी समाधानकारक आहे. आपल्या 12 पैकी 7 सामन्यांमध्ये मुंबईने विजय मिळवत 14 अंकांसहीत तिसरं स्थान मिळवलं आहे. आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर मुंबई पॉइण्ट्स टेबलमध्ये बाद फेरी संपताना दुसऱ्या स्थानी झेप घेऊ शकते. असं झाल्यास मुंबईला क्वालिफायर-1 चा सामना पहिल्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध खेळावा लागेल. मात्र हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामाना खेळेल. तर पराभूत संघाला अजून एक संधी मिळेल. क्वालिफायर-2 मधील विजेत्या संघाला अंतिम सामन्यात जाण्याआधी क्वालिफायर-2 मधील पराभूत संघाचा सामना करावा लागेल. त्यामुळेच 2 क्रमांकावर राहिल्यास मुंबईला दुहेरी फायदा होईल. दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यास केवळ 2 विजयांच्या जोरावर मुंबईला 6 व्यांदा जेतेपदावर नाव कोरता येईल.
यंदाच्या पर्वामधील पहिले दोन्ही सामने मुंबईने गमावले. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 8 विकेट्स राखून तर चेन्नईने सुपर किंग्सने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. यानंतर मात्र मुंबईच्या संघाला लय गवसली आणि पुढच्या 10 सामन्यांपैकी ते 7 सामने जिंकले. सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स 12 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसहीत पहिल्या स्तानी आहे. मुंबई वगळ्यास केवळ गुजरातचा संघच 18 किंवा त्याहून अधिक अंक मिळवू शकतो. चेन्नईचा संघ 15 गुणांसहीत दुसऱ्या स्थानी असला तरी त्यांचा एकच सामना शिल्लक असून तो जिंकला तरी ते जास्ती जास्त 17 गुणांपर्यंत उडी मारु शकतील.
मुंबई इंडियन्सचे 2 सामने शिल्लक आहेत. यापैकी पहिला सामना 16 मे रोजी लखनऊविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकल्यास मुंबईची प्ले ऑफ्सची वाट अधिक सुखकर होईल. त्यानंतर 21 मे रोजी हैदराबादविरुद्ध मुंबई मैदानात उतरले. या सामन्यामध्येही विजय मिळवल्यास मुंबई दुसऱ्या स्थानी झेप घेईल. सामने जिंकण्याबरोबरच मोठ्या फरकाने ते जिंकल्यास मुंबईला नेट रन रेट सुधारण्याचीही संधी आहे. म्हणजेच सध्या बाद फेरीतील 2 सामने जिंकून क्वालिफायर-1 चा सामना जिंकल्यास मुंबई अंतिम सामन्यात पोहचेल आणि तिथे विजय मिळवून ते सहाव्यांदा चषक जिंकू शकतील.
सध्या चौथ्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्सचा संघ असून त्यांनी 12 सामन्यांमध्ये 13 गुण मिळवले आहेत. 5 व्या क्रमांकावर 12 गुणांसहीत आरसीबी तर सहाव्या क्रमांकावर 12 गुणांसहीत राजस्थानचा संघ आहे. तसेच 7 व्या क्रमांकावर असलेला कोलकात्याचा संघही 12 गुणांसहीत प्ले ऑफ्सच्या शर्यतीत कायम आहे. तसेच शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ 12 अंकासहीत 8 व्या स्थानी आहे. त्याचबरोबर हैदराबादचा संघ 8 गुणांसहीत नवव्या स्थानी असून तो अद्यापही प्ले ऑफ्सच्या शर्यतीत आहे.
दिल्लाचा संघ प्ले ऑफ्सच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे.