सुरभि जगदीश, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईची आठवण ठेवली जाते ती म्हणजे इथे मिळणाऱ्या स्ट्रीट फूडमुळे...मुंबईत मिळणाऱ्या अन्नाची चव ही मुंबई सोडून गेल्यावरही अनेकांच्या जिभेवर रेंगाळत असते. मुंबईत आल्यानंतर काय खावं असा प्रश्न मुंबई बाहेरच्या लोकांना असतो. याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा कर्णधार पॅट कमिंन्सही अपवाद ठरला नाही.
नुकतच पॅट कमिन्सने ट्विटरवर एक ट्विट केलं होतं. यामध्ये पॅट कमिन्सने, मुंबईतील कोणत्या लोकल डीशची मी चव चाखू असा प्रश्न फॉलोवर्सना विचारला. यावेळी मुंबईकरांनी त्याला अनेक पर्याय सुचवण्यात आले. यामध्ये मुंबईतील सरकारी वैद्यकीय रूग्णालय जे.जे मधील डॉ. संजय ससाणे यांनी कमिन्सला थेट रूग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.
डॉक्टरांनी आमंत्रण दिल्यानंतर ही गोष्ट इथेच थांबली नाही तर या डॉ. संजय यांच्या ट्विटला चक्क पॅट कमिन्सने रिप्लाय केला आहे. यावेळी, मला जे.जे रूग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये जेवायला यायला आवडलं असतं. परंतु सध्या बायो बबलमध्ये आहे, असं कमिन्सने म्हटलं आहे.
Would love to but unfortunately in a Bio Bubble for this trip. https://t.co/wuBS0nKSGr
— Pat Cummins (@patcummins30) May 7, 2022
डॉ. संजय ससाणे यांनी जे.जे रूग्णालयातील आर.एम भट्ट हॉस्टेल कॅन्टीनमध्ये खास राईस प्लेटची चव चाखण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. ज्यावर पॅटने रिप्लायही दिला.
आयपीएल सुरु असल्याने ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार पॅट कमिन्स सध्या भारतात आहे. तो आयपीएलच्या केकेआर टीममधून खेळतो. यावेळी त्याला मुंबईतील फेमस फूड टेस्ट करण्याची इच्छा झाली होती.
मुंबईत येणाऱ्या प्रत्येकालाच या शहराला जवळून पहावसं वाटतं. मुळात या शहराचे रंग तुम्हाला पाहायचे असतील तर ते खाण्याच्या मार्गानं पाहता येतील, याच सिद्धांताची निवड अनेकांनीच केली. यामध्ये सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रॅमसे, इटालियन मास्टरशेफ डेव्हिड रोको विता यांच्याही नावांचा समावेश आहे.
मुंबईतील खाद्यपदार्थांनी भारावलेल्या या मंडळींच्या यादीत आता पॅट कमिन्सचं नावही घ्यायला हरकत नाही... तुमचं काय मत? त्यानं मुंबईत कुठे आणि काय खावं....? कमेंटमध्ये सुचवा पर्याय...