VIDEO: कमिन्सच्या बाऊन्सरनं करुणारत्ने मैदानातच कोसळला

सामन्याच्या ३१ व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली.  

Updated: Feb 2, 2019, 07:39 PM IST
VIDEO: कमिन्सच्या बाऊन्सरनं करुणारत्ने मैदानातच कोसळला title=

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या मॅचदरम्यान मोठी दुर्घटना घडली. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सनं टाकलेला बाऊन्सर श्रीलंकेचा बॅट्समन दिमुथ करुणारत्नेच्या डोक्याला लागला. बॉल डोक्याला लागल्यानंतर खेळपट्टीवरच कोसळला. यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या पंचांनी आणि ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या खेळाडूंनी करुणारत्नेकडे धाव घेतली. या दुर्घटनेनंतर करुणारत्नेला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  

 

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात केनबॅरा येथे सुरु दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५ विकेट गमावत ५३४ रन करून डाव घोषित केला. यानंतर खेळायला आलेल्या श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. दिमुथ करुणारत्ने आणि लहिरू थिरीमाने या दोघांनी ९० धावांची भागदारी केली. या भागीदारी दरम्यानच दिमुथ करुणारत्नेला बाऊंसर खेळताना ही दुखापत झाली.

सामन्याच्या ३१ व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. पॅट कमिंसच्या या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर हुक करण्याच्या नादात बॉल करुणारत्नेच्या हेल्मेटला लागला. हा बॉल हुकवण्याचा नादात करुणारत्ने खाली वाकला. पण तो बॉल शॉर्टपिच राहिल्याने हेल्मेटला जाऊन लागला. हा बॉल ताशी १४२ किमी च्या वेगाने टाकला होता.

करुणारत्नेला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की, तो बॉल लागताच खाली कोसळला आणि त्याच्या हातून बॅटही निसटली. पंचानी तात्काळ मेडिकल टीमला मैदानात बोलावले. मेडिकल टीमने ५ मिनिटे तपासणी केल्यानंतर करुणारत्नेला स्ट्रेचरद्वारे मैदानाबाहेर नेण्यात आले. यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार झाल्यानंतर करुनारत्नेला रुग्णालयातून परत पाठवण्यात आले आहे. 

करुणारत्नेला जेव्हा दुखापत झाली तेव्हा तो ४६ धावांवर नाबाद खेळत होता. तर श्रीलंकेची धावसंख्या बिनबाद ८२ रन होती. याआधी २०१२ ला अशाच प्रकारे डोक्यावर बॉल लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फिल ह्यूजसला त्याचा जीव गमवावा लागला होता.