ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा वापरत असलेल्या भाल्याचं वजन आणि लांबी किती... जाणून घ्या किंमत

Paris Olympics 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कामगिरीवर लागलं आहे. भालाफेक क्रीडा प्रकारात नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली असून त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 8, 2024, 05:01 PM IST
ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा वापरत असलेल्या भाल्याचं वजन आणि लांबी किती... जाणून घ्या किंमत title=

Paris Olympics 2024 : पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये संपूर्ण देशाचं लक्ष गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) कामगिरीवर लागलं आहे. भालाफेक क्रीडा प्रकारात (Javelin Throw) नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली असून त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. टोकिया ऑलिम्पिक 2020 मध्ये नीरज चोप्राने देशाला सुवर्ण पदक (Gold Medal) मिळवून दिलं होतं. आता 2024 ऑलम्पिकमध्ये पुन्हा एकदा नीरजकडून सुवर्ण कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पात्रता फेरीत नीरज चोप्राने 89.34 मीटर भालाफेक करत थेट अंतिम फेरीत धडक मारली होती. विशेष म्हणजे नीरजच्या कामगिरीच्या आसपासही कोणी खेळाडू नव्हता. 

नीरज चोप्राच्या भाल्याचं किती वजन?
पण तुम्हाला माहित आहे का नीरज चोप्रा ज्या भाल्याने सुवर्ण पदकाचं लक्ष्य गाठणार आहे, त्या भाल्याची किंमत किती आहे. त्याचं वजन लांबी किती असते. जागतिक अॅथलेटिक्सच्या नियमानुसार पुरुष भालाफेक प्रकारात भाल्याचं वजन 800 इतकं असतं. तर भाल्याची लांबी  2.6 ते 2.7 मीटर पर्यंत असावी लागते. तर महिला भालाफेक प्रकारात भाल्याचं वजन 600 ग्राम इतकं असतं. तर भाल्याची लांबी 2.2 ते 2.3 मीटरपर्यंत असण्याचा नियम असतो. 

भाल्याची किंमत किती?
टोकिया ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने ज्या भाल्याने सुवर्ण पदक मिळवलं होतं तो भाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती चिन्ह म्हणून ठेऊन घेतला. 2022 मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाने हा भाला 1.5 कोटी रुपयांना खरेदी केला. तसं पाहिलं तर ऑनलाईन स्टोरवर एका भाल्याची किंमत 930 ते 80000 रुपये इतकी असते.

भालाफेकीचे नियम
भालाफेकीसाठी मैदानावर एक रनवे तयार केला जातो. त्या रनवेरुन धावत येऊन एका हाताने भाला दूरवर फेकला जातो. भाला जितका दूर फेकला जातो, तितकी पदकाची शक्यता वाढते. 

पात्रता फेरीत नीरजची कामगिरी
पात्रता फेरीत नीरज चोप्राने  89.34 मीटर थ्रो केला. या दमदार कामगिरीच्या जोरावर नीरजने थेट अंतिम फेरीत धडक मारली. या हंगामातला नीरजचा हा दुसरा बेस्ट थ्रो होता. याच प्रकारात भारताचा आणखी एक खेळाडू किशोर जेना यानेही भाग घेतला होता. पण त्याला 80.73 थ्रो करता आला. त्यामुळे अंतिम फेरीत त्याचं स्थान लागलं नाही.

नीरज चोप्राचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
26 वर्षीय नीरज चोप्राचा अंतिम सामना 8 ऑगस्ट म्हणजे आज रात्री खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी अंतिम फेरीचा सामना सुरु होणार आहे. नीरजला माजी विश्वविजेता एंडरसन पीटर्स (88.63 मीटर), कॉमनवेल्थ पदक विजेता पाकिस्तानचा अरशद नदीम (86.59 मीटर), ब्राझीलचा लुईस  मॉरीसियो डा सिल्वा (85.91 मीटर) आणि मालदोवाचा एंड्रियन मारडेयर (84.13 मीटर) यांचं आव्हान असणार आहे. अंतिम सामनाचं थेट प्रसारण स्पोर्ट्स 18 नेटवर्क चॅनेलवर होणार आहे. तर ऑनलाईन स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर लाईव्ह पाहाता येणार आहे.