दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्याच दिवशी पाकिस्तान मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा २०२ रनवर ऑल आऊट केला. यामुळे पाकिस्तानला २८० रनची आघाडी मिळाली. पाकिस्ताननं पहिल्या इनिंगमध्ये ४८२ रन केले होते. ३३ वर्ष आणि १३ दिवसांचा ऑफ स्पिनर बिलाल आसिफनं आपल्या पहिल्याच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. आसिफनं ३६ रनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ६ विकेट घेतल्या.
एवढ्या जास्त वयात एवढ्या कमी रन देऊन ६ विकेट घेण्याचा विक्रम आसिफनं केला आहे. याआधी हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या तनवीर अहमदच्या नावावर होता. तनवीर अहमदनं २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२० रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. त्यावेळी तनवीरचं वय ३१ वर्ष आणि ३३५ दिवस होतं.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये चांगली सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाच्या ओपनरनी १४२ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. पण पाकिस्ताननं एरॉन फिंचला ६२ रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यानंतर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरू झाली. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजानं सर्वाधिक ८५ रन केले. ऑस्ट्रेलियानं ६० रनमध्ये १० विकेट गमावल्या.
ऑस्ट्रेलियाचा ऑल आऊट झाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या पाकिस्ताननंही ३ विकेट गमावल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानचा स्कोअर ४५/३ एवढा होता. पहिल्या इनिंगमधल्या २८० रनच्या आघाडीमुळे आता पाकिस्तानकडे ३२५ रनची आघाडी आहे. मॅचचे आणखी २ दिवस बाकी असल्यामुळे आता पाकिस्तानचं पारडं जड आहे.