Pakistani Player To Play in IPL 2024: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) एका ब्रिटीश महिलेशी लग्न केलं आहे. सध्या मोहम्मद आमीर हा ब्रिटीश नागरिकत्वाच्या प्रतिक्षेत आहे. नर्जिस खान या ब्रिटीश तरुणीशी लग्न केल्याने आता मोहम्मद आमीर ब्रिटीश नागरिक होणार आहे. मोहम्मद आमीर 2020 पासून युनायटेड किंग्डममध्येच वास्तव्यास आहे. मात्र मोहम्मद आमीरला ब्रिटीश नागरिकत्व मिळाल्यास त्याच्या क्रिकेटमधील करिअरची दुसरी इनिंग सुरु होऊ शकते. अगदी इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय संघाकडूनही मोहम्मद आमीरला खेळण्याची संधी मिळू शकते अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. मात्र मोहम्मद आमीरने इंडियन प्रमिअर लिग म्हणजेच 'आयपीएल'संदर्भात मोठं विधान केलं आहे.
ब्रिटीश नागरिकत्वासंदर्भात भाष्य करताना आपण एका वेळेस एक पाऊल टाकत असून फार पुढचा विचार करत नसल्याचं मोहम्मद आमीरने सांगितलं आहे. "सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी इंग्लंडकडून खेळणार नाही. मी पाकिस्तानसाठी खेळलो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे (आयपीएलबद्दल बोलायचं झाल्यास) त्यासाठी अजून एका वर्षाचा कालावधी आहे. त्यावेळी परिस्थिती कशी आहे त्यावर सर्व अवलंबून आहे. मी नेहमी सांगतो की, मी एका वेळेस एकच पाऊल टाकतो. उद्या काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही आणि मी 2024 च्या आयपीएलचा विचार करतोय असं कसं चालेल. मला माझा ब्रिटीश पासपोर्ट मिळाल्यानंतर जी सर्वोत्तम संधी मिळेल ती मी नक्कीच स्वीकारेल," असं मोहम्मद आमीरने 'एआरव्हाय न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
विशेष म्हणजे मोहम्मद आमीरने 2020 सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. संघ व्यवस्थापनाने माझा मानसिक छळ केल्याचा दावाही मोहम्मद आमीरने केला होता. मोहम्मद आमीरने 36 कसोटी सामने, 61 एकदिवसीय सामने आणि 50 टी-20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मोहम्मद आमीरने पाकिस्तानकडून खेळताना 259 विकेट्स घेतल्या आहेत. 30 ऑगस्ट 2020 रोजी मोहम्मद आमीर इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये खेळलेला टी-20 सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील शेवटचा सामना ठरला.
मोहम्मद आमीर हा दोन्ही बाजूला चेंडू स्वींग करता येणारा तरुण गोलंदाज म्हणून त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अल्पावधीत लोकप्रिय झाला होता. मात्र त्यानंतर तो स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमध्ये अडकला जेव्हा पाकिस्तानच्या संघाने 2010 च्या इंग्लंडचा दौरा केला होता. आयसीसीने मोहम्मद आमीरवर 5 वर्षांची बंदी घातली होती. 2016 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. त्याच्या गोलंदाजीच्या मदतीने पाकिस्तानच्या संघाला भारताविरुद्धचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा सामना जिंकता आला. या सामन्यात मोहम्मद आमीरने रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवनला बाद करत भारताच्या सलामीवीरांना तंबूत पाठवलं होतं.
339 धावांचा पाठलाग करताना भारताला केवळ 158 धावांपर्यंत मजल मारता आली होती. पाकिस्तानने हा सामना 180 धावांनी जिंकला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या सामन्यामध्ये मोहम्मद आमीरने 6 ओव्हमध्ये 16 धावांच्या मोबदल्यात 3 गड्यांना तंबूत पाठवलं होतं.