मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानने १५ खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे. बॅट्समन अबीद अली याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तर २०१७ सालची भारताविरुद्धची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल गाजवणाऱ्या मोहम्मद आमीरला डच्चू देण्यात आला आहे. पाकिस्तानच्या निवड समितीचे अध्यक्ष इंजमाम उल हक यांनी वर्ल्ड कपसाठीच्या पाकिस्तान टीमची घोषणा केली. २०१७ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलेल्या ११ खेळाडूंना वर्ल्ड कप टीममध्ये स्थान दिल्याचं इंजमाम उल हक म्हणाले. तसंच वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची टीम चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाकिस्तानच्या टीममध्ये अनुभवी शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज याची निवड करण्यात आली आहे. पण हाफिजबद्दलचा निर्णय तो पूर्णपणे फिट झाल्यानंतरच घेतला जाईल, असं हक यांनी सांगितलं. मोहम्मद हाफिजच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीतून तो सावरत आहे. डॉक्टरांनी हाफिजला अजूनही बॉलिंग किंवा बॅटिंग करण्याची परवानगी दिली नाही, पण दोन आठवड्यांमध्ये तो मैदानात दिसेल, असं वक्तव्य हक यांनी केलं.
मोहम्मद आमीरची टीममध्ये निवड करण्यात आली नसली तरी त्याची आणि आसिफ अली यांना इंग्लंडविरुद्धची सीरिज आणि वर्ल्ड कपसाठी राखीव खेळाडू म्हणून संधी दिली गेली आहे.
२०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर मोहम्मद आमीरचा फॉर्म कमालीचा ढासळला. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर मागच्या दोन वर्षात खेळलेल्या १४ वनडेमध्ये मोहम्मद आमीरला फक्त ५ विकेट घेता आल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये मोहम्मद आमिरने सुरुवातीलाच भारताला धक्के दिले. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली या भारताच्या तिन्ही दिग्गजांना आमिरने स्वस्तात आऊट केलं होतं.
सरफराज अहमद (कर्णधार), फकर जमान, इमाम उल हक, आबिद अली, बाबर आजम, शोएब मलिक, हॅरिस सोहेल, मोहम्मद हफीज, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, फहीम अश्रफ, शाहिन शाह आफ्रिदी, जुनैद खान, मोहम्मद हसनेन