मुंबई : आजही देशातलेच नाही तर जगभरातली लहान मुलं सचिन तेंडुलकरला आयडल मानून क्रिकेट खेळायला सुरुवात करतात. क्रिकेट विश्वातला प्रत्येक खेळाडू सचिन तेंडुलकरला भेटण्याचं स्वप्न पाहत असतो. अशीच इच्छा पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने व्यक्त केली आहे. या खेळाडूची पाकिस्तानच्या वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली आहे. पाकिस्तानचा बॅट्समन आबिद अली याने वर्ल्ड कपआधी सचिन तेंडुलकरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.
वर्ल्ड कपआधी सचिनला भेटून त्याच्याशी बातचित करण्याची इच्छा आबिद अलीने व्यक्त केली आहे. सचिनची भेट झाली, तर तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात यादगार क्षण असेल, असं आबिद अली म्हणाला. ३१ वर्षांच्या आबिद अलीने पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. मागच्या महिन्यात दुबईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धही आबिद अलीने शतक केलं होतं. या कामगिरीमुळे आबिद अलीची पाकिस्तानच्या वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली.
एका पत्रकार परिषदेमध्ये आबिद अली म्हणाला, 'मला सचिन तेंडुलकरचा भेटायची इच्छा आहे. सचिनला भेटून त्याला मिठी मारायचं माझं स्वप्न आहे. प्रत्येक महान खेळाडू युवा खेळाडूंची भेट घेतात, तसंच सचिनही मला भेट देईल. तो मला निराश करणार नाही', असा विश्वास आबिद अलीने व्यक्त केला.
'मी सचिन तेंडुलकरला माझा आदर्श मानतो. वर्ल्ड कपआधी त्याची भेट झाली तर त्याच्याकडून सल्लाही घेईन. सचिनकडून मला सकारात्मक उत्तराची अपेक्षा आहे. जर असं झालं तर तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगला दिवस असेल, कारण तो सगळ्यात महान बॅट्समन आहे,' अशी प्रतिक्रिया आबिद अलीने दिली.