मुंबई : पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल पुन्हा एकदा वादात सापडला आहे. काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचा प्रशिक्षक मिसबाह उल हकने खेळाडूंच्या फिटनेससाठी नियमावली तयार केली होती. टीममध्ये निवड होण्यासाठी ही फिटनेस टेस्ट पास होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पण पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला, त्यामुळे संतापलेल्या उमर अकमलने फिटनेस ट्रेनरसमोरच कपडे उतरवले.
उमर अकमलची याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे तक्रार करण्यात आली आहे. उमर अकमलवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. उमर अकमलवर पुढच्या मोसमात स्थानिक क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात येऊ शकते.
फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्यानंतर उमर अकमल भडकला आणि त्याने ट्रेनरसमोर कपडे काढले. कपडे काढल्यानंतर चरबी कुठे आहे दाखव, असा सवाल अकमलने ट्रेनरला विचारला.
उमर अकमलने पाकिस्तानसाठी १६ टेस्ट मॅचमध्ये १००३ रन केले, यामध्ये १ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. उमर अकलमने १२१ वनडे मॅचमध्ये ३,१९४ रन केले, यामध्ये २ शतकं आहेत.