रहाणेने जे केलंय ते अजून कोणताही भारतीय कर्णधार करू शकलेला नाही!

अजिंक्य रहाणेने कर्णधार म्हणून कोणताही भारतीय दिग्गज करू शकणार नाही अशी कामगिरी केली आहे. 

Updated: Nov 25, 2021, 01:55 PM IST
रहाणेने जे केलंय ते अजून कोणताही भारतीय कर्णधार करू शकलेला नाही! title=

मुंबई : भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिल्या टेस्ट मॅचला आज कानपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे सोपवली आहे. तर उपकर्णधार चेतेश्वर पुजाराकडे देण्यात आलंय. 

अजिंक्य रहाणेने कर्णधार म्हणून कोणताही भारतीय दिग्गज करू शकणार नाही अशी कामगिरी केली आहे. मुख्य म्हणजे अजिंक्य रहाणेने कोहलीच्या अनुपस्थितीत आतापर्यंत 5 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. मात्र यापैकी एकही सामना गमावला नाही, तर एकच सामना अनिर्णित राहिला आहे.

रहाणेच्या नेतृत्वाखाली एकही कसोटी सामना गमावला नाही

अशा परिस्थितीत रहाणे हा भारताचा एकमेव कर्णधार आहे ज्याने 5 किंवा त्याहून अधिक कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार असताना एकही सामना गमावलेला नाही. रहाणेला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही आपला अजिंक्य रथ पुढे नेण्याची इच्छा आहे.

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्याच्याच घरच्या मैदानात पराभूत केलं. त्यादरम्यान बिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध पहिल्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

रहाणेपूर्वी, कृष्णमाचारी श्रीकांत हा एकमेव भारतीय कसोटी कर्णधार आहे ज्याने एकही सामना गमावलेला नाही. पण श्रीकांतने तेव्हा केवळ 4 कसोटीतच कर्णधारपद भूषवलं होतं.

मात्र, त्याच्या कर्णधारपदाची एक गोष्ट म्हणजे त्याला 4 पैकी एकही सामना जिंकता आला नाही. सर्व सामने अनिर्णित राहिले. अशा स्थितीत रहाणेचा विजय आणि विक्रम अधिक महत्त्वाचे ठरतात.

कोहली सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार

भारतीय कसोटी कर्णधारांमध्ये विराट कोहली सर्वात यशस्वी ठरला आहे. त्याने आतापर्यंत 65 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे, त्यापैकी 38 सामने जिंकले आहेत आणि 16 गमावले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली 11 कसोटी सामने अनिर्णित राहिले. 

विराट कोहली हा कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी खेळणारा भारतीय आहे. त्याच्या खालोखाल महेंद्रसिंग धोनीचा क्रमांक लागतो, ज्याने 60 मध्ये 27 कसोटी जिंकल्या आहेत आणि 18 गमावल्या आहेत. 15 सामने अनिर्णित राहिले.