आता शास्त्रीनी काय केलं? गांगुलीचा टोला

बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणारा सौरव गांगुली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यातलं नातं सर्वश्रुत आहे.

Updated: Oct 19, 2019, 10:40 AM IST
आता शास्त्रीनी काय केलं? गांगुलीचा टोला title=

कोलकाता : बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणारा सौरव गांगुली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यातलं नातं सर्वश्रुत आहे. गांगुलीची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रशिक्षक रवी शास्त्रींचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यातच रवी शास्त्रींची नियुक्ती केलेल्या क्रिकेट सल्लागार समितीवर परस्पर हितसंबंधांचे आरोप झाले. बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांच्याकडे हे प्रकरण गेलं आहे.

बीसीसीआयच्या लोकपालनी ही समिती अवैध ठरवली तर शास्त्रीला त्याचं पद गमवावं लागू शकतं का? असा सवाल गांगुलीला विचारण्यात आला. तेव्हा 'मला वाटत नाही, असं काही करायची गरज आहे. कारण जेव्हा आम्ही प्रशिक्षकाची निवड केली होती, तेव्हाही हितसंबंधांचा मुद्दा समोर आला होता,' असं गांगुली म्हणाला.

बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायचं निश्चित झाल्यानंतर रवी शास्त्रींशी बोलणं झालं का? असा प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला, तेव्हा आता शास्त्रींनी काय केलं? असा टोला गांगुलीने लगावला.

रवी शास्त्रींना कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालच्या क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली होती. शांता रंगस्वामी आणि अंशुमन गायकवाडही या समितीचे सदस्या होते. या समितीवर परस्पर हितसंबंधांच्या बाबतीत आक्षेप घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनाही सल्लागार समिती अवैध ठरली तर शास्त्रींना पुन्हा प्रशिक्षक म्हणून निवडावं लागेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. पण त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. या प्रश्न काल्पनिक असल्यामुळे यावर मला काहीच बोलायचं नाही, असं वक्तव्य राय यांनी केलं आहे.

२०२० सालच्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत रवी शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. प्रशिक्षक होण्यासाठी शास्त्रींबरोबर माईक हेसन, टॉम मूडी, फिल सिमन्स, रॉबिन सिंग आणि लालचंद राजपूत यांच्यात स्पर्धा होती.