प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

नोवाकने सर्बिया आणि क्रोएशिया येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता

Updated: Jun 23, 2020, 07:14 PM IST
प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण  title=

मुंबई : जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर असलेला टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण झाली आहे. जोकोविचने सोमवारी कोरोनाची चाचणी केली होती. दुसऱ्या दिवशी त्याच्या चाचणीचा रिपोर्ट आला. तसेच जोकोविचची पत्नीला देखील कोरोना झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे जोकोविचच्या मुलांना कोरोनाची लागण झालेली नाही. जोकोविचने एड्रिया टूरमध्ये सहभाग घेतला होता. या टूरमध्ये सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. 

नोवाक १४ दिवस विलगीकरणात राहणार आहे. अद्याप तरी नोवाकमध्ये करोनाची कोणतीच लक्षणं आढळलेली नाहीत.  स्टेटमेंट जारी करताना त्याने सांगितलं आहे की, “बेलग्रेड येथे पोहोचताच आम्ही करोना चाचणी केली असताना माझा आणि पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुदैवाने मुलांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आहे”. 

कोरोना व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी जोकोविच एड्रिया टूरमुळे चर्चेत होता. नोवाकने सर्बिया आणि क्रोएशिया येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. येथील काही खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. अंतिम सामना रद्द झाल्यानंतर नोवाक क्रोएशियाला निघून गेला होता. यानंतर त्याने आपली चाचणी केली होती.

याआधी स्पर्धेत सहभागी विक्टर ट्रोईकी याने आपण आणि आपल्या पत्नीला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा नोवाक या दौऱ्यातील मुख्य चेहरा होता.