लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी दारुण पराभव झाला. पण या पराभवानंतरही भारतीय टीमला अजूनही जाग आलेली नाही असंच म्हणावं लागेल. सोमवार आणि मंगळवारी भारतीय टीमनं सरावच केला नसल्याची माहिती आता समोर येत आहे. लंडनवरून भारतीय टीम आज (बुधवारी) नॉटिंगहॅमला प्रवास करणार आहे. म्हणजेच आता गुरुवारीच भारतीय टीम सरावासाठी मैदानात उतरु शकते. लोकेश राहुल, मुरली विजय, अजिंक्य रहाणे आणि इतर भारतीय बॅट्समन इंग्लंडमध्ये लोटांगण घालत आहेत. असं असताना आता या बॅट्समनना सरावासाठी दोनच दिवस मिळणार आहेत. १८ ऑगस्टपासून या सीरिजची तिसरी टेस्ट सुरु होणार आहे.
भारतीय टीमनं सीरिजआधी केलेल्या कमी सरावावर याआधीच सुनील गावसकर यांनी टीका केली होती. वनडे सीरिज संपल्यानंतर भारतीय टीमनं ५ दिवसांचा आराम घेतला. पण टेस्ट सीरिजचा सराव करण्यासाठी एवढी विश्रांती घेणं योग्य नसल्याचं गावसकर म्हणाले होते. तसंच तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढा तुमचा फायदा जास्त होईल, असं सौरव गांगुली दुसऱ्या टेस्टमधल्या पराभवानंतर म्हणाला होता.
विराट कोहलीनं मात्र या दिग्गजांपेक्षा वेगळं मत व्यक्त केलं होतं. भारतीय बॅट्समनच्या तंत्रामध्ये चूक नाही तर त्यांच्या मानसिकतेत चूक आहे. बॅटिंग करताना काय करायचंय याबाबत तुमच्या डोक्यात स्पष्टता असेल तर तुम्ही स्विंग होणाऱ्या बॉलचा सामना करु शकता, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली होती.