मुंबई : पंजाब किंग्ज फलंदाज निकोलस पूरन याने देखील भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आयपीएलमधील कमाई भारत सरकारला डोनेट करण्याचा निर्णय निकोलस पूरनने घेतला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लोकांचा होत असलेला मृत्यू यामुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि गुरुवारी 3 लाख 86 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा कहर अजूनही थांबत नसल्याचं दिसत आहे. कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीये. ऑक्सीजनचा तुडवडा आहे. औषधं मिळणं कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत भारताला विविध स्तरातून मदत होत आहे.
निकोलस पूरने याने भारतातील लोकांना लस लवकरात लवकर मिळावी अशी विनंती केली. ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पूरन म्हणाला की, 'जर तुम्हाला ही लस मिळत असेल तर लवकर घ्या. मी भारतासाठी प्रार्थना करत राहीन आणि या संकटावर मात करण्यासाठी माझ्या आयपीएल पगाराचा एक अंश दान करू इच्छित आहे.'
तो म्हणाला की, 'मला जगभरातील सर्व चाहत्यांना आणि समर्थकांना सांगायचे आहे की मी आयपीएलमध्ये (बायो-बबल) सुरक्षित आणि उत्तम स्थितीत आहे.
निकोलस पूरन म्हणाला की, 'ज्या देशाने गेल्या अनेक वर्षांत आम्हाला खूप प्रेम आणि पाठिंबा दर्शविला आहे त्या देशासाठी मी माझ्या सहकारी खेळाडूंना भारतातील या परिस्थितीबद्दल थोडी जागरूकता आणण्यास मदत करू शकतो. '
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांनीही भारताला मदत केली आहे. कमिन्सने कोरोना विरुद्ध लढ्यासाठी भारताला 37 लाख रुपये तर ब्रेट लीने भारताला सुमारे 41 लाख रुपयांची मदत केली आहे. भारताला मदत केल्याबद्दल या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना साथीच्या विरूद्ध दिल्ली कॅपिटल्सने दीड कोटी रुपये दिले आहेत. ज्याच्या माध्यमातून अत्यावश्यक वैद्यकीय पुरवठा, ऑक्सिजन सिलिंडर आणि कोविड किट खरेदी केले जातील. तर राजस्थान रॉयल्सने 7.5 कोटींची मोठी मदत केली आहे.