कानपूर : टॉम लॅथम आणि विल यंग यांनी कानपूर कसोटी सामन्यात न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 129 धावांची अखंड भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यंग 75 आणि लॅथम 50 धावांवर खेळत होते. तर आता दोन विकेट्स काढण्यात भारताला यश मिळालं आहे.
या खेळीदरम्यान टॉम लॅथमला नशिबाने पूर्ण साथ दिली. तीन वेळा मैदानावरील अंपायरने लॅथमला आऊट करार दिला होता. परंतु लॅथमने रिव्ह्यू घेतल्यानंतर निर्णय बदलला. अशाप्रकारे, टॉम लॅथम कसोटी क्रिकेटच्या कोणत्याही एका डावात 3 वेळा अंपायरचा निर्णय उलटवणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी इंग्लंडच्या मोईन अलीने 2016 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या चितगाव कसोटीत ही कामगिरी केली होती.
यानंतर किवी अष्टपैलू जिमी नीशमने यावरून टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे. नीशमने ट्विट केले की, 'टॉम लॅथमने यावेळी शतक झळकावलं तर भारत त्यांच्याचकडे डीआरएस घेण्यास नकार देऊ शकतो.'
If Tommy Latham gets a ton here India might go back to refusing to use DRS at home
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) November 26, 2021
तिसर्याच ओव्हरमध्ये इशांत शर्माचा चेंडू त्याच्या पॅडला लागला तेव्हा लॅथमला मैदानावरील अंपायरने प्रथम LBW आऊट दिलं. लॅथमने रिव्ह्यू घेतला, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसून आलं की, चेंडू बॅटच्या आतील काठाने पॅडला लागला होता.
15व्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजाचा चेंडू त्याच्या पॅडला लागल्याने मैदानावरील अंपायरने सलामीवीराला पुन्हा एलबीडब्ल्यू आऊट केलं. पण पुन्हा एकदा, लॅथमने लगेच डीआरएस घेतला आणि रिप्लेमध्ये दिसलं की चेंडू त्याच्या बॅटच्या आतील बाजूला लागला होता.
तर शेवटच्या सेशनमध्ये रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर विकेटकीपर वृद्धिमान साहाने लॅथमला कॅचआऊट केलं. पण त्याची बॅट पुढच्या पॅडला लागल्याने निर्णय पुन्हा बदलला गेला.