चेन्नई : चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात 26 एप्रिलला झालेल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 156 रनच्या मोबदल्यात चेन्नईला केवळ 109 रन करता आल्या. चेन्नईची टीम 17.4 ओव्हरमध्ये गारद झाली. यामध्ये मुंबईने चेन्नईचा 46 रन्सने पराभव केला.
मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात झालेला सामना हा या पर्वातील दुसरा सामना होता. मुंबईने चेन्नईचा या पर्वात दुसरा पराभव केला आहे. या विजयासह मुंबईचा हा या पर्वातील सातवा विजय ठरला. चेन्नईच्या या पराभवासह मोसमात आपल्या होम ग्राऊंडवर पहिल्यांदा पराभूत झाली. तसेच या मैदानावरील चेन्नईची सर्वात निच्चांकी धावसंख्या देखील ठरली आहे. मुंबईने या पर्वात चेन्नईचा दोन्ही मॅचमध्ये पराभूत करणारी एकमेव टीम ठरली आहे. मुंबईला प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी केवळ 1 मॅच जिंकायची आहे.
आयपीएलच्या-12 व्या पर्वात प्ले-ऑफमध्ये चेन्नईने सर्वात आधी पोहचली आहे. चेन्नईचा नियमित कॅप्टन महेंद्रसिह धोनीच्या अनुपस्थित चेन्नईचे नेतृत्व सुरेश रैनाकडे देण्यात आले होते.
मुंबईने विजयासाठी दिलेल्या 156 रनच्या आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईची निराशाजनक सुरुवात झाली. चेन्नईने ठराविक अंतराने आपले विकेट गमावले. मुंबईच्या बॉलर्सच्या पुढे चेन्नईच्या बॅट्समनना तग धरता आला नाही. चेन्नईच्या 5 खेळाडूंना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. तसेच दोन खेळाडू भोपळा देखील फोडता आला नाही.
चेन्नईकडून मुरली विजयने 38 तर मिचेल सॅनटरने 22 धावा केल्या. परंतु इतर कोणत्याही खेळाडूंना या दोघांना साथ देता आली नाही. लसिथ मलिंगाने मुंबईकडून सर्वाधिक 4 विकेट घेतले. कृणाल पांड्या- जस्प्रीत बुमराह या जोडीने प्रत्येकी 2 तर हार्दिक पांड्या-अनुकूल रॉयने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
याआधी चेन्नईने टॉ़स जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. मुंबईची दिलासादायक सुरुवात झाली. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक 67 रन ठोकल्या. यामध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर ऐविन लेविसने 32 रनची उपयोगी खेळी केली. अखेरच्या टप्प्यात हार्दिक पांड्याने नाबाद 23 रनची खेळी केली. या खेळीच्या जोरावर मुंबईला चेन्नईला 156 रनचे आव्हान देता आले. चेन्नईकडून मिचेल सँटनरने 2, तर दिपक चहर आणि इम्रान ताहीरने प्रत्येकी 1-1 विकेट घेतला. मुंबईच्या या विजयामुळे मुंबई अंकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.