धोनीच्या पाठदुखीमुळे वाढली चेन्नईची चिंता

आयपीएलमध्ये दोन वर्षांनी कमबॅक करणाऱ्या चेन्नईच्या चिंता काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Updated: Apr 19, 2018, 08:30 PM IST
धोनीच्या पाठदुखीमुळे वाढली चेन्नईची चिंता title=

मुंबई : आयपीएलमध्ये दोन वर्षांनी कमबॅक करणाऱ्या चेन्नईच्या चिंता काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. कावेरी नदीच्या पाण्याचा वाद पेटल्यामुळे चेन्नईचे सामने पुण्यात हलवण्यात आले. तर खेळाडूंच्या दुखापतीमुळेही चेन्नईला धक्का बसला आहे. केदार जाधव मांड्यांच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धा खेळू शकणार नाही. तर सुरेश रैना दोन ते तीन मॅच खेळू शकणार नाही. त्यातच आता चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या पाठदुखीमुळे चेन्नईची चिंता वाढली आहे.

धोनीनं केला नाही सराव

पंजाबविरुद्धच्या मागच्या मॅचमध्ये धोनी पाठ दुखत असतानाही खेळत होता. पण आता शुक्रवारी राजस्थानविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये धोनी खेळणार का नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. राजस्थानविरुद्धच्या मॅचआधीच्या सरावालाही धोनी उपस्थित नव्हता.

बॅट्समन म्हणून खेळणार धोनी

या मॅचमध्ये धोनी विकेट कीपिंग करणार नाही तर तो फक्त बॅट्समन म्हणून मैदानात उतरेल अशी शक्यता आहे. एन. जगदीशन किंवा अंबाती रायडूकडे विकेट कीपिंगची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते.

पाठदुखी असतानाही धोनीची वादळी खेळी

पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या. यातल्या ४७ रन तर धोनीनं शेवटच्या ४ ओव्हरमध्ये फटकावल्या. १९८ रनचा पाठलाग करत असताना धोनीला चेन्नईला १९३ रनपर्यंतच पोहोचवता आलं, त्यामुळे चेन्नईचा ४ रननी पराभव झाला. चेन्नईचा या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी धोनीनं मात्र सगळ्यांचं मन जिंकलं.