इंग्रजीचा गोंधळ, शमीच्या मदतीला विराट धावला

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा ८ विकेटनी शानदार विजय झाला.

Updated: Jan 23, 2019, 08:38 PM IST
इंग्रजीचा गोंधळ, शमीच्या मदतीला विराट धावला title=

नेपियर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा ८ विकेटनी शानदार विजय झाला. भारतीय बॉलरनी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे न्यूझीलंडचा संघ १५७ धावांवर ऑल आऊट झाला. कुलदीप यादवनं या मॅचमध्ये सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर मोहम्मद शमीला ३, युझवेंद्र चहलला २ आणि केदार जाधवला १ विकेट मिळाली. या मॅचमध्ये कुलदीपला सर्वाधिक विकेट मिळाल्या असल्या तरी न्यूझीलंडला सुरुवातीचे धक्के मोहम्मद शमीनं दिले. त्यामुळे शमी हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

मॅचसंपल्यानंतरच्या कार्यक्रमामध्ये मोहम्मद शमीला काही प्रश्न विचारण्यात आले. पण इंग्रजी समजण्यात गोंधळ झाल्यामुळे लगेचच कर्णधार विराट कोहली शमीच्या मदतीला धावून आला. शमीच्या उत्तरांचं विराट कोहलीनं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं.

आम्ही आत्तापर्यंत सांघिक प्रयत्नातून सगळं मिळवलं आहे. आम्ही एकमेकांच्या यशाचा आनंद घेतो. जर आमच्याकडे असलेला प्लान ए काम करत नसेल तर प्लान बी तयार असतो. आम्ही सगळे बॉलर मिळून एकत्र काम करतो, असं मोहम्मद शमी म्हणाला. दुखापतीमुळे माझा दृष्टीकोन बदलला आहे. बऱ्याच कालावधीनंतर मी पुनरागमन केलं आणि चांगला वेळ घालवला, असं शमीनं सांगितलं.

मोहम्मद शमी वर्ल्ड कपचा दावेदार

सततच्या चांगल्या कामगिरीमुळे मोहम्मद शमी आता वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचा दावेदार म्हणून समोर येऊ लागला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमनाचं श्रेय शमीनं त्याच्या मागच्या १२ महिन्यांमधल्या कसोटी कामगिरीला दिलं आहे. शमीनं ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध भारतात झालेल्या मालिकेतून एकदिवसीय संघात पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही शमीनं उत्कृष्ट कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शमीनं १९ धावा देऊन ३ विकेट घेतल्या.

२८ वर्षांचा फास्ट बॉलर असलेला शमी फिटनेस आणि वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमधून बाहेर येऊन सर्वश्रेष्ठ कामगिरी करत आहे. शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी मॅचमध्ये १०० विकेट पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.

हा विक्रम करण्यासाठीचा प्रवास खूप मोठा होता. २०१५ सालचा वर्ल्ड कप मी खेळलो, यानंतर दुखापतग्रस्त झालो. या दुखापतीतून सावरायला मला २ वर्ष लागली. २०१६ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये माझी निवड झाली. काही कालावधीनंतर माझ्यात पूर्ण आत्मविश्वास आला आणि आपली गाडी पुन्हा रुळावर आल्याचं मला कळलं, असं वक्तव्य मोहम्मद शमीनं केलं.