दिल्ली : मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेला भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी मैदानात उतरला आहे. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमकडून शमी खेळणार आहे. यासाठीच्या सरावाला शमीनं सुरुवात केली आहे. एका अपघातामध्ये शमीच्या डोक्याला इजा झाली होती. त्याआधी शमीची पत्नी हसीन जहांनं त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. तसंच शमीचं निलंबन व्हावं, अशी मागणी हसीन जहांनं केली होती.
मागच्या महिन्यामध्ये हसीन जहांनं शमीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. तसंच शमीनं मॅच फिक्सिंग केल्याचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही हसीन जहांनं केला होता. या दाव्यानंतर बीसीसीआयनं शमीच्या कराराचं नुतनीकरण केलं नव्हतं. पण सखोल चौकशीनंतर शमीविरोधातले मॅच फिक्सिंगचे आरोप सिद्ध झाले नाहीत, म्हणून बीसीसीआयनं शमीसोबतच्या कराराचं नुतनीकरण केलं.
यानंतर दिल्लीवरून डेहराडूनला जात असताना मोहम्मद शमीच्या गाडीचा अपघात झाला. शमीच्या गाडीला ट्रकनं धडक दिली. यामध्ये शमीच्या डोळ्याच्या बाजूला दुखापत झाली. मोहम्मद शमीला ५ टाकेही टाकण्यात आले.
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात शमीनं फिटनेस ड्रीलसोबत कॅच पकडण्याचा सराव केला. शमीच्या डोक्यावर अजूनही बँड एड दिसत होतं. आयपीएल लिलावामध्ये सनरायजर्स हैदराबादनं शमीला ३ कोटी रुपयांना विकत घेतलं, पण दिल्ली डेअरडेव्हिल्सनं राईट टू मॅच कार्डचा वापर करून त्याला पुन्हा विकत घेतलं. यावर्षी शमीची बेस प्राईज १ कोटी रुपये होती.