मुंबई : भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. पहिल्यापासूनच अनेक आरोप करणाऱ्या शमीच्या पत्नीनं आता नवीन केस दाखल केली आहे. हसीन जहांनं पश्चिम बंगालच्या अलीपोर कोर्टात शमी आणि त्याच्या परिवारावर घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली आहे. शमीनं भत्ता आणि उपचारांचा खर्चही दिला नसल्याचं या केसमध्ये नमुद करण्यात आलं आहे.
हसीन जहांनं काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या टीमचे सीईओ हेमंत दुआंची भेट घेतली होती. जोपर्यंत आमच्यामधले वाद संपत नाहीत तोपर्यंत शमीला टी-20मध्ये खेळण्याची परवानगी देऊ नका, अशी मागणी हसीननं दुआंकडे केली होती.
मोहम्मद शमीला दिल्लीच्या टीमनं ३ कोटी रुपये देऊन कायम ठेवलं होतं. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकानंही शमीला क्लिन चीट दिली होती. हसीन जहांनं शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोप केल्यानंतर बीसीसीआयनं चौकशी केली होती.
दोनच दिवसांपूर्वी शमीच्या लग्नाला ४ वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसाला शमी त्याची पत्नी आणि मुलीची आठवण काढत होता. याबद्दलचा फोटोही त्यानं इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. माझ्या बेबीला लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाचा केक, मिस यू, असं म्हणत शमीनं हा फोटो शेअर केला होता.
शमीवर दबाव टाकण्यासाठी हसीननं बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना यांचीही भेट घेतली. पण खन्नांनी तिला कोणतीही मदत करायला नकार दिला. शमी आणि हसीनमधला वाद वैयक्तिक आहे. यामध्ये बीसीसीआय काहीही करु शकत नाही, असं स्पष्टीकरण खन्नांनी दिलं.
बीसीसीआयनं क्लिन चीट दिल्यानंतर मोहम्मद शमी डेहराडूनला सराव करण्यासाठी जात होता. यावेळी त्याच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर हसीन जहां शमीला भेटायला गेली होती. भेट झाली असता शमीनं मला धमकी दिल्याचा आरोप हसीननं केला. शमीनं मला भेटायला नकार दिला आणि तुला कोर्टातच बघून घेईन, अशी धमकी दिल्याचं हसीन जहां म्हणाली.