...तरच मोहम्मद शमी आयपीएलमध्ये खेळणार

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नीनं गंभीर आरोप केले आहेत.

Shreyas deshpande Updated: Mar 17, 2018, 06:09 PM IST
...तरच मोहम्मद शमी आयपीएलमध्ये खेळणार  title=

मुंबई : भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नीनं गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपांचाही समावेश आहे. याप्रकरणी बीसीसीआयचं भ्रष्टाचार विरोधी पथक शमीची चौकशी करत आहे. या चौकशीतून क्लीन चीट मिळाली तरच मोहम्मद शमीबरोबर बीसीसीआय करार करेल. तसंच यानंतरच त्याला आयपीएलमध्ये खेळता येईल. शमीच्या पत्नीनं केलेल्या आरोपानंतर बीसीसीआयनं शमीबरोबरच्या कराराचं नुतनीकरण केलं नव्हतं. तसंच शमीच्या आयपीएल खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.

शमीच्या पत्नीनं त्याच्यावर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. यातल्या घरगुती हिंसाचारप्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये मोहम्मद शमी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टीममध्ये आहे. ३ कोटी रुपये देऊन दिल्लीनं शमीला विकत घेतलं होतं. पण भ्रष्टाचार विरोधी पथकानं क्लीन चीट दिली तरच त्याला आयपीएलमध्ये खेळता येईल, असं स्पष्ट करण्यात आलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चौकशीचा रिपोर्ट दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच आयपीएल सुरु व्हायच्या आधी येईल. हा रिपोर्ट आल्यावरच शमी आयपीएल खेळणार का नाही, हे स्पष्ट होईल.

मोहम्मद शमीची ३ तास चौकशी

बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकानं गुरुवारी शमीची तब्बल ३ तास चौकशी केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून परतल्यावरच्या घटनाक्रमाची संपूर्ण माहिती यावेळी शमीकडून घेण्यात आली.