'इम्रान खान दहशतवाद्यांच्या हातातील बाहुलं'; कैफचा निशाणा

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे.

Updated: Oct 7, 2019, 08:10 PM IST
'इम्रान खान दहशतवाद्यांच्या हातातील बाहुलं'; कैफचा निशाणा title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. इम्रान खान हे दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्कराच्या हातातलं बाहुलं आहेत, असं कैफ म्हणाला आहे. 'तुमचा देश पाकिस्तानचा दहशतवादाशी संबंध आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादाला खतपाणी घातलं जातं. संयुक्त राष्ट्रामध्ये इम्रान खान यांनी केलेलं भाषण दुर्दैवी आहे. एकेकाळी महान क्रिकेटपटू असलेला माणूस पाकिस्तान लष्कर आणि दहशतवाद्यांच्या हातातलं बाहुलं झाला आहे,' असं ट्विट कैफने केलं आहे.

संयुक्त राष्ट्रामध्ये केलेल्या भाषणानंतर इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. इम्रान खानचं भाषण मुर्खपणाचं होतं. इम्रान खान काही जणांसाठी आदर्श होता, पण आता तसं नाही, असं सौरव गांगुली म्हणाला आहे.

हरभजन सिंग, मोहम्मद शमी आणि इरफान पठाण यांनीही इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला होता. संयुक्त राष्ट्रामध्ये केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी भारताच्या प्रगतीवर भाष्य केलं. पण इम्रान खान यांनी त्यांच्या ५० मिनिटांच्या भाषणात काश्मीरचा मुद्दा मांडला आणि अणूशस्त्र लढाईची धमकीही दिली.

५ ऑगस्टला भारताने जम्मू काश्मीरला विशेष अधिकार देणारं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए काढून घेतलं. तसंच जम्मू-काश्मीरचं त्रिभाजन केलं. जम्मू, काश्मीर आणि लडाख असे ३ केंद्रशासीत प्रदेश करण्यात आले.