रनचा पाठलाग करताना मितालीचंच 'राज'! कोहली-धोनीही मागे

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीनं भारताला रनचा पाठलाग करताना अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत.

Updated: Jan 30, 2019, 04:43 PM IST
रनचा पाठलाग करताना मितालीचंच 'राज'! कोहली-धोनीही मागे title=

मुंबई : विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीनं भारताला रनचा पाठलाग करताना अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. जोपर्यंत हे दोघं मैदानात असतात तोपर्यंत भारताला विजयाचा भरवसा असतो. या दोन्ही खेळाडूंना 'चेस मास्टर' म्हणूनही ओळखलं जातं. पण या दोन्ही खेळाडूंना भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राजनं मागे टाकलं आहे.

काही महिन्यांपूर्वी मिताली राज माजी प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याशी झालेल्या वादामुळे चर्चेत होती. वेस्टइंडिजमध्ये २०१८ साली झालेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये मितालीला खेळवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे हा वाद झाला होता. पण ३६ वर्षांच्या मितालीला नवीन वर्ष चांगलं जात आहे. मितालीच्या नेतृत्वात भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मितालीनं शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारून भारताला धोनी स्टाईल विजय मिळवून दिला.

भारतीय महिला टीमनं दुसऱ्या वनडेमध्ये न्यूझीलंडला ८ विकेटनी पराभूत केलं, आणि ३ मॅचच्या सीरिजमध्ये विजय मिळवला. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतलेल्या भारतानं न्यूझीलंडचा ४४.२ ओव्हरमध्ये १६१ रनवर ऑल आऊट केला. यानंतर स्मृती मंधानानं नाबाद ९० आणि कर्णधार मिताली राजनं नाबाद ६३ रन करून भारताला जिंकवलं. या दोघींमध्ये तिसऱ्या विकेटसाठी नाबाद १५१ रनची भागीदारी झाली होती. एकावेळी भारताचा स्कोअर १५ रनवर २ विकेट होता. जेमिमा रॉड्रिक्स शून्य रनवर आणि दीप्ती शर्मा ८ रनवर आऊट झाल्या होत्या. यानंतर स्मृती आणि मितालीनं भारताला सावरलं.

आव्हानाचा पाठलाग करताना मिताली राजची सरासरी १११.२९ एवढी झाली आहे. याबाबतीत धोनीची सरासरी १०३.०७ आणि कोहलीची सरासरी ९६.२३ एवढी आहे. आव्हानाचा पाठलाग करत असताना मितालीनं धोनी आणि विराटलाही मागे टाकलं आहे.

न्यूझीलंडला दुसऱ्या वनडेमध्ये पराभूत केल्यानंतर आता सीरिज ३-०नं जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं मिताली राजनं सांगितलं. तसंच टीममधल्या युवा खेळाडूंनाही तिसऱ्या वनडेमध्ये संधी दिली जाऊ शकते, असे संकेत मितालीनं दिले.