मुंबई : आयपीएलच्या ११व्या सीझनला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या मॅचमध्ये आयपीएलची मागच्या वर्षीची चॅम्पियन मुंबई इंडियन्सची लढत चेन्नई सुपरकिंग्जशी होईल. पण आयपीएल सुरु व्हायच्या आधीच मुंबईच्या टीममध्ये न्यूझीलंडच्या मिचेल मॅकलेनघनचं पुनरागमन झालं आहे. जेसन बेहरनड्रॉफला दुखापत झाल्यामुळे मुंबईनं त्याच्याऐवजी मॅकलेनघनला टीममध्ये घेतलं आहे. बेहरनड्रॉफला पाठीची दुखापत झाल्यामुळे तो पूर्ण आयपीएल खेळू शकणार नाही.
२०१५, २०१६ आणि २०१७ सालच्या आयपीएलमध्ये मॅकलेनघन मुंबईच्या टीममध्ये होता. २०१७ साली मॅकलेनघननं १४ मॅचमध्ये १९ विकेट घेतल्या होता. हा मॅकलेनघनचा सगळ्यात यशस्वी मोसम होता. २०१६ साली मॅकलेनघननं १४ मॅचमध्ये १७ विकेट घेतल्या तर २०१५मध्ये त्यानं १२ मॅचमध्ये १८ विकेट घेतल्या. यंदाच्या मोसमामध्ये मुंबईनं मॅकलेनघनला १ कोटी रुपये देऊन विकत घेतलं आहे.
३१ वर्षांचा मॅकलेनघन मार्च २०१६ साली न्यूझीलंडकडून शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान सुपरलीगमध्ये मॅकलेनघन लाहोर कलंदर्सकडून खेळला.